कोल्हापूर : जिल्ह्यातील ७८ गावांमध्ये ४५ वर्ष आणि त्यापुढील वयाच्या नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणामुळे या गावांमध्ये कोरोना संसर्गाला मोठा आळा बसला आहे. उर्वरित गावांचेही लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनातर्फे नियोजन करण्यात येत आहे.
या ७८ पैकी ३३ गावांमध्ये कोरोनाचे शून्य रुग्ण, ३० गावांत ५ पेक्षा कमी रुग्ण, ९ गावांमध्ये १० पेक्षा कमी रुग्ण तर, ६ गावांत १० पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. या गावांनी नियोजनबद्धरित्या प्रयत्न केल्यामुळे फक्त २४४ रुग्ण आढळले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इतर गावांनीही कोरोनाला गावाच्या वेशीवर थोपवून धरावे, असे आवाहन आरोग्य प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
----
दिव्यांगांसाठी विशेष मोहीम
जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये विशेष लसीकरण मोहिमेंतर्गत ८३४ दिव्यांगांना लस देण्यात आली आहे. शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या १६४ विद्यार्थ्यांचे व्यवसाय, नोकरीनिमित्त विदेशी जाऊ इच्छिणाऱ्या १४२ नागरिकांचे, तसेच २३ तृतीय पंथीयांचेही लसीकरण करण्यात आले. त्यासाठी प्रत्येक सोमवारी तालुक्याच्या ठिकाणी सकाळी १० ते २ या वेळेत विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात येणार असून, या विशेष सत्राव्दारे दिव्यांगांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
---