आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १३ : चोरीमधील सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार संशयित उत्तम राजाराम बारड (वय २४, रा. धामोड, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) याला गुरुवारी कोल्हापूर पोलिसांनी गुजरी येथे सापळा रचून पकडले. त्याने साथीदारांच्या मदतीने कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कर्नाटकातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहा घरफोड्या आणि दरोडा घातल्याचे उघडकीस आले आहेत. पोलिस दफ्तरी बारड याच्यावर ४० गुन्ह्यांची नोंद असून त्यांच्यावर लवकरच तडीपारची कारवाई करणार असल्याचे जिल्हा पोलस अधीक्षक एम. बी. तांबडे यांनी गुरुवारी कोल्हापूरात पत्रकार परिषदेत सांगितले.या विविध गुन्ह्यातील सुमारे २४ तोळे सोन्याचे दागिने, १३८ ग्रॅम चांदीचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा सुमारे साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी बारड याच्याकडून जप्त केला आहे. त्याचा दुसरा साथीदार संशयित प्रमोद उर्फ सूरज काळे (रा. दौंड, जि. पुणे) हा सध्या संकेश्वर पोलिसांकडे असून त्याला या गुन्ह्याप्रकरणी लवकरच ताब्यात घेणार असल्याचेही तांबडे यांनी यावेळी सांगितले.सरवडे येथे १८ जानेवारी २०१७ रोजी अंबिका ज्वेलर्स या दुकानाचे शटर कटावणीने उचकटून उत्तम बारड, त्याचा साथीदार संशयित रविंद्र सुर्यवंशीसह अन्य साथीदारांनी आत प्रवेश केला. त्यावेळी दुकानाचे मालक व त्यांचा पत्नीस मारहाण करुन सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे दोन लाख २५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. यावेळी बारडच्या साथीदारांनी गावातील लकी ड्रेसेस येथेही चोरी केली. याबाबतची नोंदही राधानगरी पोलिसात झाली आहे.दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राधानगरी पोलिसांनी संयुक्तरित्या या प्रकरणाचा तपास सुरु केला. संशयित उत्तम बारड हा गुजरी येथे चोरीमधील सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी गुरुवारी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला तेथेच पोलिसांनी सापळा रचून पकडले. बारड याने सरवडे येथील अंबिका ज्वेलर्स व लकी ड्रेसेस येथे चोरी केल्याची कबुली दिली. त्याचबरोबर त्याने व त्याच्या साथीदारांनी राधानगरी पोलिस ठाण्यात एक दरोडा व एक घरफोडीचा, वडगांवात एक घरफोडी तसेच जयसिंगपूर, जैनापूर, उदगांव, उमळवाड, कोथळी या जयसिंगपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा घरफोडीचे याशिवाय कोडोली व कणकवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक घरफोडी असे ११ गुन्हे केल्याची कबुली दिली.ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, एस.एस.सुर्वे, उपनिरीक्षक युवराज आठरे, राजेंद्र सानप, शरद माळी, सहाय्यक फौजदार विजय कोळी, शिवाजीराव खोराटे, सुनील इंगवले, राजेश आडूळकर,जितेंद्र भोसले, राजेंद्र हांडे, संजय कुंभार, श्रीकांत पाटील, संजय हुंबे, हणमंत ढवळे, संतोष माने, यशवंत उपराटे, रमेश डोईफोडे, प्रकाश संकपाळ, आनंद निगडे, असिफ कलायगार आदींनी केली. यावेळी सहाय्यक पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार,अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांच्यासह पोलिस उपअधीक्षक,पोलिस निरीक्षक उपस्थित होते.तीन दुचाकीवरुन नऊजणसरवडे येथे चोरी केल्यानंतर बारडसह त्याचे साथीदार तीन दुचाकीवरुन आले होते.साधारणत : एका दुचाकीवर तिघेजण असे नऊ जण आल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना तपासावेळी दिली होती, असे तांबडे यांनी यावेळी सांगितले.बारडचा गुन्हेगारीचा चढता आलेख...११ गुन्ह्यापैकी २०१६ चे चार तर २०१७ चे सात गुन्हे बारड याच्यावर आहेत. त्यामध्ये एक दरोड्यासह दहा घरफोड्यांचा समावेश आहे. तो संकेश्र्वर पोलिसातील घरफोडीच्या गुन्ह्यातही फरारी आहे.दिवसेंदिवस संशयित उत्तम बारडचा गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून त्याला तडीपार करण्यात येणार आहे.-एम.बी.तांबडे, जिल्हा पोलिस अधीक्षक,कोल्हापूर.
दरोड्यासह १० घरफोड्या उघडकीस, सराईत उत्तम बारडला कोल्हापूरात अटक
By admin | Updated: April 13, 2017 17:06 IST