उल्हासनगर महापालिका शाळेत खासगी शाळेतील विद्यार्थी गिरवितात धडे; अतिक्रमणाची भिती
By सदानंद नाईक | Published: April 3, 2024 08:41 PM2024-04-03T20:41:06+5:302024-04-03T20:41:49+5:30
शाळेवर अतिक्रमण होण्याची भीती, आयुक्तांचे माहिती घेऊन कारवाईचे संकेत
उल्हासनगर : कॅम्प नं-५, मच्छी मार्केट येथील महापालिका शाळेतील खोल्यात खाजगी शाळेतील मुले धडे गिरवीत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी शाळेच्या दोन खोल्यात वर्ग सुरू असल्याची माहिती दिली असून आयुक्त अजीज शेख यांनी माहिती घेऊन कारवाई करण्याचे संकेत दिले.
उल्हासनगर कॅम्प नं-५, येथील मच्छी मार्केट शेजारी महापालिकेच्या मराठी, हिंदी व सिंधी माध्यमाच्या अश्या तीन शाळा इमारती आहेत. त्यापैकी पटसंख्या अभावी शाळा क्रं-२२ ही सिंधी माध्यमाची शाळा बंद करण्यात आली. त्या बंद शाळेच्या काही खोल्यात एका खाजगी शाळेचे वर्ग सुरू असल्याची बाब उघड झाली. याच शाळेच्या मैदानावर एका संस्थेने सनद काढण्याचा प्रकारही दोन वर्षांपूर्वी उघड झाल्यावर, महापालिकेने याविरोधात तक्रार केली. मात्र त्याचा पाठपुरावा होत नसल्याने, मैदान घशात जाणार असल्याची टीकाटिप्पणी नागरिकांकडून सुरू झाली. तसेच शाळा जागा व मैदानावर अतिक्रमण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच मंगळवारी शाळा क्रं-२२ व १९ च्या एका प्रवेशद्वार मधून एका संस्थेचे जाणे-येणे सुरू असल्याने, शाळा मुख्याध्यापकांनी वरिष्ठांच्या आदेशाने शाळेचे प्रवेशद्वार सील केल्याचा प्रकार घडला आहे.
महापालिका शाळेतील वर्ग खोल्यात एका खाजगी शाळेचे वर्ग सुरू असल्याबाबतची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. मात्र त्याच्या परवानगी बाबत त्यांना सांगता आले नाही. सविस्तर माहितीसाठी लेंगरेकर यांनी शिक्षण विभागाचे उपायुक्त सुभाष जाधव यांच्या सोबत संपर्क साधण्याचे सांगितले. जाधव यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी मिटिंग मध्ये असल्याचे सांगितले. तर आयुक्त अजीज शेख यांनी याबाबत माहिती घेऊन कारवाईचे संकेत दिले. महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी दीपक धनगर यांच्याशी याबाबत संपर्क केला असता, त्यांनी याबाबत अधिक चौकशी करून माहिती घेणार असल्याचे सांगितले. एकूणच महापालिका शिक्षण विभागाला आपल्याच शाळा बाबत माहिती नसल्याचे उघड झाले आहे.