- सदानंद नाईक
उल्हासनगर : गेल्या ७ ते ८ वर्षात कधीही न भेटलेल्या पर्यावरणवादी सरिता खानचंदानी यांच्या आत्महत्या प्रकरणी उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्यावर खोट्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. सदर गुन्हा मागे घेण्याची मागणी उद्धवसेनेच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्याकडे केली. तसेच गुन्हा मागे न घेतल्यास जिल्हाभर आंदोलनाचा इशारा दिला.
पर्यावरण सामाजिक कार्यकर्त्यां सरिता खानचंदानी यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरविल्याची खोटी तक्रार त्यांचे पती पुरुषोत्तम खानचंदानी यांनी ४ सप्टेंबर रोजी केली. त्यांच्या तक्ररारीवरून बोडारे यांच्यासह ५ जणांवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सदर तक्रार पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित असून जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्याशी झालेल्या चर्चेअंती ते सरिता खानचंदानी यांना गेल्या ७ ते ८ वर्षात एकदाही भेटले नाही. अथवा समोरासमोर येणे-जाणे झालेले नाही. तसेच त्यांचे कधीही फोनवरून एकमेकांसोबत संभाषण झालेले नाही, असे निवेदन उद्धवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांना दिले. दाखल केलेला गुन्हा व सुसाईड नोट यांच्यावर त्यांनी संशय व्यक्त करून सखोल चौकशीची मागणी केली.
सरिता खानचंदानी त्यांच्या सहकारी असणाऱ्या जिया गोकलानी या महिले सोबत २८ ऑगस्ट रोजी रात्री भांडण होऊन दुसऱ्या दिवशी आत्महत्येचा प्रकार घडला. जियाच्या तक्ररीवरून मारहाणीचा गुन्हा सरिता यांच्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला. सरिता हिने विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये याच तक्रारीवरून गोंधळ घालून, तुम्ही ही तक्रार नोंदवली, तर मी आत्महत्या करीन, असे संपूर्ण पोलीस स्टेशन समोर बोलून गेली. तेव्हा कुठेही बोडारे यांचा कसलाही उल्लेख झालेला नाही. बोडारे यांचा कसलाही संबंध नसताना खोटेनाटे सूसाईड नोट हा खोटा पुरावा तयार करून, अडकविण्याचा प्रयत्न आहे. तसेच याला राजकारणाचा गंध देखील येत असल्याचा संशय शिष्टमंडळाने व्यक्त केला.