अशा वाढवता येतील लोकल फेऱ्या, रात्री ८ ते ८.४० मध्ये पाच लांबपल्यांच्या गाड्यांमुळे एकही जलद लोकल मुंबईतून नाही
By अनिकेत घमंडी | Published: February 29, 2024 10:17 AM2024-02-29T10:17:51+5:302024-02-29T10:17:59+5:30
कल्याण पुढे येणाऱ्या लांबपल्यांच्या गाड्या या उपनगरी लोकल वाहतुकीला अडथळा होत आहेत, त्या गाड्या मुंबईपर्यन्त आणू नये ही प्रवासी संघटनांची अनेक वर्षांपासून मागणी आहे.
अनिकेत घमंडी
डोंबिवली: कल्याण पुढे येणाऱ्या लांबपल्यांच्या गाड्या या उपनगरी लोकल वाहतुकीला अडथळा होत आहेत, त्या गाड्या मुंबईपर्यन्त आणू नये ही प्रवासी संघटनांची अनेक वर्षांपासून मागणी आहे. विशेषतः रात्री ८ ते ८. ४० दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून कल्याण कडे जाणारी एकही जलद लोकल नाही. कारण त्या दरम्यान सीएसएमटी, दादरहून नागपूर दुरांतो, महालक्ष्मी एक्सप्रेस, नागरकाँइल एक्सप्रेस, दादर-हूबळी एक्स्प्रेस, दादर-तिरूनवेली एक्सप्रेस ह्या पाच गाड्या सुटतात. त्या गाड्यांच्या वेळात थोडा बदल करून दर दोन एक्सप्रेसमध्ये एक लोकल चालवणे शक्य असल्याचे मत रेल्वेच्या सेवानिवृत्त अधिकारी व प्रवासी समस्यांच्या जाणकार अभ्यासकांनी नोंदवले. पण त्यासाठी रेल्वे प्रशासनाची प्रबळ इच्छाशक्ती असणे गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
अभ्यासकांनी रेल्वेने जाहीर।केलेल्या वेळापत्रकाचा आधार घेऊन ही मत मांडली असल्याचे सांगण्यात आले. मुंबईहून (सीएसएमटी)संध्याकाळी ५.१५ वा सुटणारी हावडा दुरांतो ही गाडी एलटीटीवरून सोडावी, ह्यामुळे ह्या गाडीच्या जागी एक जादा लोकल चालवता येईल. नाहूर येथील गुड्स यार्ड हल्ली फारसा वापरात नाही, त्यामुळे तेथे प्रवासी गाड्यांसाठी आवश्यक त्या सोयी निर्माण करून, त्या यार्डाचा उपयोग करून ठाणे स्टेशनातून काही एक्सप्रेस गाड्या चालवणे. दुरांतो एक्सप्रेसच्या धोरणात बदल करून, किमान मुंबई कडे येणाऱ्या दुरांतो एक्सप्रेस, उतरणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी पनवेल, कल्याण, ठाणे, दादर स्टेशनात थांबवाव्यात. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी व सावंतवाडी ह्या दोन पँसेंजर दिवा स्टेशन ऐवजी दादरहून चालवाव्यात. वंदे भारत गाड्यां मध्ये वापरलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून, कसारा व खंडाळा घाट चढू, उतरू शकणाऱ्या मेमू गाड्या बनवून सामान्य प्रवाशांसाठी मुंबई - पुणे, नाशिक दरम्यान स्थानिक गरजेनुसार फेऱ्या सुरू कराव्यात.
कोपर स्टेशनात मेल, एक्सप्रेस गाड्या थांबण्यासाठी प्लँटफाँर्मच्या लांबी विस्तारसह आवश्यक त्या सोय करणे. एलटीटीमध्ये दोन जादा प्लँटफाँर्मचे काम पूर्ण झाल्यावर, सीएसएमटी व दादरहून सुटणाऱ्या/येणाऱ्या काही मेल/एक्सप्रेस एलटीटीवरून चालवणे. एलटीटीवरून दिवा वसई मार्गाने गुजरात, राजस्थान कडे एक्स्प्रेस गाड्या सुरू करणे. मुंबई - नांदेड राज्य राणी एक्सप्रेसचा ठाणे स्टेशनातील टेक्निकल हॉल्ट हा पँसेंजर हाँल्ट करावा. सर्व मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे स्टेशनात थांबण्याची आवश्यकता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.