अनिकेत घमंडी
कल्याण-डोंबिवली महापालिकेत १२२ जागांपैकी युतीला १०३ ठिकाणी यश मिळाले. महापालिकेत युतीचीच सत्ता हे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या ५६ उमेदवारांपैकी ५०, तर शिंदेसेनेच्या ६८ पैकी ५३ नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपचा स्ट्राइकरेट जास्त असल्याने सत्तास्थापनेत त्यांची भूमिका निर्णायक ठरेल. मोठा भाऊ कोण यावरून महापौरपदासाठी दोन्ही मित्र पक्षांत कुरघोडीचे राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. तथापि, हा तिढा सोडविण्याचे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आपल्या पक्षाकडेच महापौरपद असावे यासाठी आग्रही आहेत. त्यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर विश्वास असल्याने ते महापौर कुणाचा, या विषयावर बोलणे टाळत आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी युती नव्हती, केडीएमसीमध्ये ती असावी, असा उपमुख्यमंत्री शिंदे यांचा आग्रह होता. खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा क्षेत्रातील ही महत्त्वाची महापालिका. त्यामुळे युती असणे शिंदे पिता-पुत्रांना महत्त्वाचे वाटत होते, झालेही तसेच. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, चव्हाण यांच्यात ज्या चर्चा झाल्या त्यांत युती व्हावी, असे ठरले. त्याच बैठकीत महापौरपदाबाबतही चर्चा झाली असणार. त्याखेरीज चव्हाण युतीसाठी तयार होणार नाहीत, असेही सांगण्यात येते. चव्हाण यांनी अंबरनाथ, बदलापूरमध्ये भाजपचे नगराध्यक्ष बसवले. त्यामुळे आता कल्याण-डोंबिवलीतही भाजपचाच महापौर बसेल, असा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे.
अंबरनाथमध्ये सत्ता स्थापण्यात चव्हाण यांनी त्यांचे शिलेदार कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी दिली होती. त्यानुसार दोन दिवसांपासून चव्हाण- परब यांच्यात गुप्त चर्चा सुरू आहे. शिंदेसेनेने शुक्रवारी रात्री आपल्या नगरसेवकांना सतर्कतेचे आदेश दिले. त्याउलट भाजपने मात्र आपल्या नगरसेवकांना प्रभागात जाऊन नागरिकांना भेटा, त्यांचे आभार माना, अशा सूचना दिल्या. त्यामुळे शिंदेसेनेत तुलनेने अस्वस्थता दिसत असली, तरी भाजपमध्ये मात्र कमालीची शांतता आहे. ही शांतता आपल्यासाठी धोकादायक असू शकते, असे वाटण्यातून शिंदेसेनेत अस्वस्थता तर नाही ना, असा प्रश्न आहे.
संख्याबळ वाढवण्यासाठी आता उद्धवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांशी देखील संपर्क ठेवला जात असल्याची चर्चा आहे. भाजपने अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत. रविवारपर्यंत ते युतीचा महापौर होणार असेच सूतोवाच करत होते.आता महापौरपदाची सोडत आणि त्यानंतर होणाऱ्या घडामोडींकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. काही इच्छुकांनी स्वतःहूनच पक्षाने तसा शब्द दिला असल्याचेही सांगायला सुरुवात केली आहे.
एकूणच गेल्या पंधरा दिवसांत चव्हाण यांनी अंबरनाथमध्ये सत्तास्थापनेसाठी आकड्यांची जी समीकरणे केली, तसेच त्यांना शह देण्यासाठी शिंदेसेनेनेही अखेरपर्यंत जे प्रयत्न केले, ते पाहता कल्याण-डोंबिवलीच्या सत्तेसाठी या दोन्ही पक्षांत कुरघोडीचे राजकारण रंगेल, हे स्पष्टच आहे.
Web Summary : KDMC's election saw the alliance win, but tensions rise between BJP and Shiv Sena over the Mayor's position. With BJP's strong performance, they are vying for the top post, challenging Shiv Sena's influence. Negotiations are crucial to resolve this power struggle.
Web Summary : केडीएमसी चुनाव में गठबंधन की जीत हुई, लेकिन महापौर पद को लेकर भाजपा और शिवसेना के बीच तनाव बढ़ रहा है। भाजपा के मजबूत प्रदर्शन के साथ, वे शीर्ष पद के लिए प्रतिस्पर्धा कर रहे हैं, शिवसेना के प्रभाव को चुनौती दे रहे हैं। इस सत्ता संघर्ष को हल करने के लिए बातचीत महत्वपूर्ण है।