कल्याण : म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजरामुळे वैद्यकीय क्षेत्रासमोरही नवीन आव्हान उभे राहिले आहे. त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध घालणे हाच सर्वोत्तम उपाय असून त्यासाठी आवश्यक ती सर्वतोपरी काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांच्या वेबिनारमध्ये करण्यात आले आहे. इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याण आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली 'म्युकरमायकोसिस'वरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. कोविड रुग्णांवर आवश्यकता नसल्यास पहिल्या आठवड्यात स्टेरॉइड्सचा वापर न करणे, आवश्यकता भासल्यास स्टेरॉइड्सचा योग्य आणि गरज पडेल तितक्याच प्रमाणात वापर करणे, रुग्णाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी काटेकोरपणे देखरेख ठेवणे, म्युकरमायकोसिसच्या संशयित रुग्णांमध्ये योग्य चाचण्या आणि गरज भासल्यास आवश्यक शस्त्रक्रियात्मक मूल्यमापन करणे यासारखे महत्वपूर्ण मुद्दे यावेळी अधोरेखित करण्यात आल्याची माहिती इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली. म्युकरमायकोसिस'वर उपचार करण्याचे वैद्यकीय क्षेत्रापुढे मोठे आव्हान असून ते अत्यंत खर्चिक आहे. त्यावरील शस्त्रक्रिया उपचार पद्धतही अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीची असल्याने सध्या तरी त्याला प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी काळजी घेणे हाच एकमेव पर्याय सध्या समोर असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी मांडले. या वेबिनारमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह ठाणे आणि मुंबईतील तब्बल ४०० हून अधिक डॉक्टर सहभागी झाले होते.
'म्युकरमायकोसिसवर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध घालणे हाच सर्वोत्तम उपाय'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 18:37 IST
तज्ज्ञांनी व्यक्त केले मत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत म्युकरमायकोसिस'चे रुग्ण आढळून आले आहेत.
'म्युकरमायकोसिसवर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध घालणे हाच सर्वोत्तम उपाय'
ठळक मुद्देकल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत म्युकरमायकोसिस'चे रुग्ण आढळून आले आहेत.