- सदानंद नाईकउल्हासनगर : ऐक आठवडाभर उपचार घेतलेल्या रुग्णाला बरे झाल्याचे दाखवित रुग्णालयाने डिस्चार्ज दिला. मात्र रुग्णाला घरी नेताच काही तासात त्याचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ मृत रुग्णांच्या नातेवाईकानी रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस याबाबत तपास करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-४, सरस्वतीनगर मध्ये राहणारे लालचंद गुप्ता यांना अर्धांगवायुचा झटका आल्याने, एका आठवड्या पूर्वी कॅम्प नं-३ येथील क्रिटीकेअर हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले. क्रिटीकेअर हॉस्पिटल डॉक्टरानीं लालचंद गुप्ता यांची तब्येत चांगली झाल्याचे सांगून शनिवारी सायंकाळी ५ वाजता डिस्चार्ज दिला. रुग्ण लालचंद गुप्ता यांच्या नातेवाईकांनी मोठ्या आनंदाने त्यांना घरी नेले. मात्र काही तासात त्यांची तब्येत बिघडून मृत्यू झाला. याप्रकाराने संतप्त झालेल्या नातेवाईकानी लालचंद यांचा मृतदेह घेऊन रुग्णालयात धाव घेत जाब विचारीत रुग्णालयाची तोडफोड केली. वेळीच मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर परिस्थिती आटोक्यात आली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गुप्ता यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकानी केला असून चौकशी करून कारवाईची मागणी केली.
मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी पोलिसांकरवी रुग्णालयातील परीस्थिती शांतपणे हाताळली. त्यांनी रुग्णांलयातील सीसीटिव्हीची कॅमेऱ्याची तपासणी सुरू केली असून त्यानंतर कारवाई करण्याचे संकेत दिले. क्रिटीकेअर रुग्णालयात शहरातील नामांकित उपचार घेण्यासाठी येतात. त्यांच्याकडून चूक झाली का? याबाबत तपास करण्यात येत आहे.