शिक्षण व्यवस्था काळानुरूप अद्ययावत करण्याची गरज- चेतन भगत

By प्रशांत माने | Published: December 3, 2022 07:16 PM2022-12-03T19:16:23+5:302022-12-03T19:17:11+5:30

"आयुष्यात यश मिळवण्यासाठी कष्टाला कोणताही पर्याय नाही"

Need to update education system with time says well known author Chetan Bhagat | शिक्षण व्यवस्था काळानुरूप अद्ययावत करण्याची गरज- चेतन भगत

शिक्षण व्यवस्था काळानुरूप अद्ययावत करण्याची गरज- चेतन भगत

लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: इंग्रजांनी त्यांच्या फायद्यासाठी बनवलेली शिक्षण व्यवस्था आजही आपण वापरत असलो तरी ती व्यवस्था आता काळानुरूप अद्ययावत करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ख्यातनाम लेखक चेतन भगत यांनी कल्याणमध्ये केले. इथल्या केंब्रिया इंटरनॅशनल महाविद्यालयाच्या वतीने के.सी. गांधी शाळेच्या सभागृहात आयोजित केलेल्या करिअर गाईडन्स कार्यक्रमात ते बोलत होते.

"आमच्या वयामध्ये जेवढे पर्याय उपलब्ध नव्हते त्यापेक्षा कित्येक पटीने नवनविन क्षेत्रांची दालने आज खुली झाली आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे तर करिअरची व्याख्याच पूर्णपणे बदलून गेली असून जग कुठे चालले आहे आणि मी कुठे आहे या गोष्टींचा विचार करूनच करिअर निवडणे महत्वाचे आहे. आताच्या काळात मुलांनी आणि पालकांनी करिअरसाठी पारंपरिक पद्धतीने विचार करण्यापेक्षा जगामध्ये काय सुरू आहे याचाही गांभिर्याने विचार केला पाहिजे याकडेही भगत यांनी लक्ष वेधले. भगत पुढे म्हणाले आपल्या आयुष्यात अनिश्चितता, असुरिक्षतता आणि रिस्क असणे आवश्यक आहे. हेच खरं आयुष्य असून सुरक्षित आयुष्याचा कंफर्ट झोन सोडून आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बाळगा. कोणाच्याही आयुष्यात निश्चित आणि सुरिक्षत असे काहीच नाहीये आणि हीच तर आयुष्याची खरी गंमत आहे," असे भगत म्हणाले.

आयुष्यात यश मिळवण्यासाठी कष्टाला कोणताही पर्याय नाहीये. आता आपल्याला जी गोष्ट दु:ख देतेय नंतर त्याच गोष्टीतून आपल्याला सुख आणि आनंद मिळणार आहे या दृष्टीकोनातूनच यशस्वी लोकं काम करत असतात. आपणही एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो असल्याचे सांगत भगत यांनी उमेदीच्या काळात त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षाचा जीवनपट त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवला. यावेळी पोटे ग्रुपच्या संचालक मीनल पोटे, केंब्रिया इंटरनॅशनल शाळेच्या प्रिन्सिपल हिना फाळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मार्गदर्शन कार्यक्रमानंतर पोटे ग्रुपचे सीएमडी बिपिन पोटे यांनी भगत यांना सध्याची शिक्षण पद्धती, जागतिक बदल, विद्यार्थी आणि पालकांचा दृष्टीकोन आदींबाबत प्रश्न विचारले. ज्याची भगत यांनी अत्यंत समर्पक अशी उत्तरे दिली.

Web Title: Need to update education system with time says well known author Chetan Bhagat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.