कल्याणकरांनी अनुभवली सुरेश वाडकरांची सुरेल मैफल! 

By सचिन सागरे | Published: November 12, 2023 04:13 PM2023-11-12T16:13:11+5:302023-11-12T16:13:36+5:30

भाजपा व कपिल पाटील फाऊंडेशनची रंगली `दिवाळी पहाट'

Kalyankar experienced Suresh Wadkar's melodious concert! | कल्याणकरांनी अनुभवली सुरेश वाडकरांची सुरेल मैफल! 

कल्याणकरांनी अनुभवली सुरेश वाडकरांची सुरेल मैफल! 

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या सुरेल सूरात रंगलेली `दिवाळी पहाट' कल्याणकरांसाठी संस्मरणीय ठरली. भाजपा व कपिल पाटील फाऊंडेशनने आयोजित केलेल्या दिवाळी पहाटमध्ये पाच तासांहून अधिक काळ चाललेल्या या मैफिलीत हिंदी, मराठी चित्रपटांतील गीतांबरोबरच धार्मिक गीतांनी कल्याणकरांना आनंदाची अनुभूतीचा अनुभव मिळाला.

भाजपा व कपिल पाटील फाऊंडेशनतर्फे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पश्चिमेकडील खडकपाडा येथील साई चौकात प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्यासमवेत दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला होता. सुरेश वाडकर यांच्याबरोबरच गायिका प्रियंका बर्वे, स्वप्नजा लेले, के. गिरीश यांच्या बहारदार गीतांबरोबरच श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, शिवाली परब आणि पृथ्वीक प्रताप यांनी सादर केलेल्या विनोदी किस्स्यांची मैफल रंगली. नृत्यांगना माधुरी पवार यांच्या नृत्याला रसिकांनी दाद दिली. प्रकाश वाडेकर यांनी सादर केलेले `शिवडमरू ताल'ने वातावरणात जोष भरला होता. कल्याणमध्ये कपिल पाटील फाऊंडेशनने सातव्या वर्षी सादर केलेल्या दिवाळी पहाटला रसिकांची विक्रमी गर्दी होती. तसेच सुरेश वाडकरांची गीते ऐकण्यासाठी कल्याणमधील एक वृद्धा `व्हील चेअर'वर आवर्जून उपस्थित राहिली होती.

या वेळी राज्य सरकारचा प्रतिष्ठेचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ज्येष्ठ व प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांचा केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याणवासियांच्या वतीने गौरव केला. जगद्वविख्यात गायिका लतादीदी मंगेशकर यांची तुलना होऊ शकत नाही. त्याचपद्धतीने सुरेश वाडकर यांचीही तुलना होऊ शकत नाही, अशा भावना कपिल पाटील यांनी व्यक्त करून सुरेश वाडकर यांचे अभिनंदन केले.

गणरायाला वंदन करणारे `ओंकार स्वरुपा' गीतापासून सुरेश वाडकर यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यांच्या मराठी-हिंदीमधील सुपरहिट गाण्यांवर रसिकांनी ताल धरला होता. ‘ए जिंदगी गले लगा ले’, ‘पाहिले न मी तुला’, ‘लगी आज सावन की’ गीतांबरोबरच ‘मेघा रे मेघा रे’, ‘माझे राणी माझे मोरा’, ‘तुमसे मिलके ऐसा लगा’ आदी बहारदार गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले होते.

या कार्यक्रमाला भाजपाचे आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी, टीडीसीसी बॅंकेचे संचालक प्रशांत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील, भिवंडीचे माजी नगरसेवक सुमित पाटील, सिद्धेश पाटील, केडीएमसी आयुक्त भाऊसाहेब दांगडे, भिवंडी महापालिका आयुक्त अजय वैद्य, भाजपाचे कल्याण शहराध्यक्ष वरुण पाटील, माजी नगरसेवक अर्जुन भोईर, अर्जुन म्हात्रे, बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, शहराध्यक्ष संजय भोईर, शरद तेली, शीतल तोंडलीकर, वैशाली पाटील आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.

Web Title: Kalyankar experienced Suresh Wadkar's melodious concert!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.