सचिन सागरे
कल्याण : गुन्ह्याचा उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान कितीही महत्त्वाचे असले, तरी पारंपरिक तपासाची ताकद आजही कमी झालेली नाही, हे खडकपाडा पोलिसांनी सिद्ध केले आहे. मार्च महिन्यात घडलेल्या हत्येच्या घटनेत सीसीटीव्ही फुटेज, फोरेन्सिक तपास आणि श्वान पथक निष्फळ ठरले. तरीही पोलिसांनी पारंपरिक तपास पद्धतीचा अवलंब करून खून करणाऱ्याला गजाआड केले.
२० मार्च २०२५ रोजी रात्री ८ वाजता अटाळी परिसरातील ज्ञानेश्वरनगर येथील चाळीत राहणाऱ्या रजनी चंद्रकांत पाटकर (६०) यांचा चोरीच्या उद्देशाने खून करण्यात आला. ही माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदीप शिवले, सहायक पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड आणि विजय गायकवाड यांच्या पथकाने तपास सुरू केला. क्राइम ब्रँचदेखील समांतर तपास करत होते.
सुमारे ८०० घरांचा हा परिसर कसून शोधण्यात आला. मात्र, परिसरात सीसीटीव्ही नसल्याने तसेच श्वान पथक व फोरेन्सिक तपासातून धागेदोरे न मिळाल्याने तपासात अडथळा निर्माण झाला. स्थानिक सराईत गुन्हेगारांची माहिती घेतली, पण सुरुवातीला काहीच निष्पन्न झाले नाही. घटनेच्या काही दिवसांनंतर मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी चाँद ऊर्फ अकबर मेहबूब शेख (३०, रा. नवनाथ कॉलनी) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. यापूर्वी कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेला चाँद आठ महिन्यांपूर्वीच कारागृहातून सुटला होता. याच संशयामुळे पोलिसांची त्याची कसून चौकशी केली असता त्याने खून रजनी पाटकर यांचा खून केल्याची कबुली दिली. मोमोजचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशांची गरज असल्याने रजनी यांच्या घरावर डोळा ठेवून चोरीसाठी खून केल्याचे त्याने तपासात पोलिसांना सांगितले.
असा केला गुन्हा
रजनी या एकट्या असल्याची संधी साधून चाँद पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात शिरला. त्यांना ढकलून, तोंड दाबून रजनी यांचा खून केला. त्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातील कर्णफुले असा एकूण १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चोरीचे दागिने पोलिसांनी त्याच्या लपविलेल्या ठिकाणाहून हस्तगत केले. सध्या चाँद न्यायालयीन कोठडीत असून, या घटनेने पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले आहे की, पारंपरिक तपास पोलिसांना यश मिळवून देऊ शकतो.