डोंबिवली: राज्य सरकारची मराठयांना आरक्षण देण्याची सध्याची भुमिका सकारात्मक असल्याचे दिसत आहे. राज्य सरकारची इच्छाशक्ती असेल तर नक्कीच मराठयांना आरक्षण मिळेल असे प्रतिपादन मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केले. पाटील यांनी डोंबिवलीत साखळी उपोषणाला बसलेल्या मराठा समाजाच्या बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे मत मांडले.
पाटील पुढे म्हणाले याआधी राज्य सरकार आरक्षणाबाबत स्पष्टपणे बोलतं नव्हते. वरवरचे बोलले जात होतं. परंतु बुधवारच्या सर्वपक्षीय बैठकीत ब-याचशा बाबी स्पष्ट झाल्या. मराठा समाज मागासलेला आहे हे सिध्द करावे लागेल तसेच आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागेल या बाबी सरकारने करायला हव्यात. अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठयांना आरक्षण दयावे लागेल यासाठी काही वेळ लागणार आहे. राज्य सरकारने सत्य परिस्थिती मराठा समाजाला विश्वासात घेऊन त्यांच्यासमोर मांडणे गरजेचे आहे. आंदोलनकर्त्यांनी देखील आपले जीव धोक्यात न घालता सत्य परिस्थिती जाणून घ्यायला हवी. सर्वपक्षीय बैठकीत सरकार हे आरक्षण देण्याबाबत सकारात्मक असल्याचे जाणवले असून समाजाने सरकारला देखील वेळ दयायला हवा. आत्महत्या, उपोषणासारखे प्रकार न करता सामंजस्याची भुमिका घ्यावी, समाजाला आरक्षण नक्कीच मिळेल असे पाटील म्हणाले.
अंगाशी आले की आमचे खांदे वापरले जातात
सरकारच्या अगांशी एखादे प्रकरण आल्याशिवाय ते सर्वपक्षीय बैठक बोलावत नाहीत. त्यांच्या अंगाशी आल्यावर त्यांना आमचे खांदे पाहिजे असतात. पण महाराष्ट्राचा विचार करून सर्वजण एकत्र आले आहेत. वस्तुस्थिती सरकारने यापुर्वीच विश्वासात घेऊन सांगायला हवी होती. त्यामुळे पहिली बैठक निष्फळ ठरली असावी. दुस-या बैठकीत मात्र वस्तुस्थिती समोर आली आहे. सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे सरकारवर विश्वास ठेवून त्यांना थोडा अवधी दयायला हवा असे पाटील म्हणाले.