लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली : इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून दोन वर्षांचा चिमुकला खाली पडला, मात्र भावेश एकनाथ म्हात्रे या तरुणाची सतर्कता आणि त्याने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे त्या चिमुकल्याचा जीव वाचल्याची घटना शनिवारी घडली. चिमुकल्याला पकडत असतानाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील देवीचा पाडा येथील गावदेवी मंदिराजवळील १३ मजली अनुराज हाइटस टॉवर या इमारतीत ही घटना घडली. भावेश हा त्या इमारतीत राहणाऱ्या मित्राकडे गेला होता. तेथून परतत असताना इमारतीच्या आवारात असलेल्या दोन व्यक्तींचा मोठा आवाज आला. त्यावेळी त्याठिकाणी असलेल्या भावेशने दुसऱ्या मजल्यावरून खाली पडणाऱ्या चिमुकल्याला पाहिले. भावेशने क्षणाचाही विलंब न लावता त्या दिशेने धाव घेतली.
चिमुकला खाली कोसळत असताना भावेशने त्याला हातावर झेलण्याचा प्रयत्न केला, परंतु तो हातातून निसटून अलगद पायावर पडला. या प्रकारात चिमुकल्याला किरकोळ दुखापत झाली. मात्र त्याचा जीव वाचला.