अंबरनाथ / कल्याण : निवडणुकीत गाफील राहू नका, मतदार आपल्याला मतदान करतात. मात्र, ही मते चोरीला जातात. त्यामुळे मतदार याद्यांचा अभ्यास करा, प्रत्येक यादीवर दोन बीएलओ नेमा आणि गट अध्यक्षांना याद्यांची जबाबदारी वाटून द्या, असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी अंबरनाथमध्ये पदाधिकारी मेळाव्यात दिला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज यांनी शुक्रवारी अंबरनाथ शहराचा दौरा केला. अंबरनाथच्या हॉलमध्ये पदाधिकारी मेळावा घेत संवाद साधला. मात्र, यावेळी उद्धव ठाकरे यांच्याशी संभाव्य युतीबाबत त्यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही. मनसेतून शिंदेसेनेत अलीकडेच गेलेल्या नगरसेवकांबाबतही राज यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही. अंबरनाथ शहराच्या नव्या कार्यकारिणीत त्यांनी अनेक नव्या चेहऱ्यांना विविध पदावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे.
ड्युप्लिकेट मतदारांच्या मुद्द्यांकडे लक्ष
कल्याण शहराला भेट देऊन राज यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. येथील हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात राज यांनी मतदारयादीवर काम करण्यास सांगितले. मतदारांची योग्य माहिती मिळवून सखोल अभ्यास करण्याचे निर्देश दिले.
ड्युप्लिकेट मतदारांच्या मुद्याकडे लक्ष देण्याची सूचना केली. प्रत्येक इच्छुक पदाधिकाऱ्याने नवीन मतदारांशी संपर्क साधून त्यांच्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
येत्या ५ ऑक्टोबरनंतर मतदार यादीसंदर्भात शिबिर आयोजित केले जाणार आहे, त्याची माहिती लवकरच जाहीर केली जाईल, असे ते म्हणाले. याप्रसंगी अभिजीत पानसे, माजी आ. प्रकाश भोईर, माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.