मुंबई : शिव मराठा स्पोर्ट्स क्लबने ओम भारत क्रीडा मंडळ आयोजित आमदार-नगरसेवक चषक कबड्डी स्पर्धेतील कुमार गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत त्यांनी शिवशक्ती क्रीडा मंडळ (खार) संघावर २६-१६ असा १० गुणांनी विजय मिळवत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. सुमीत जाधवच्या दमदार चढायामुळे त्यांनी पहिल्या सत्रातच १५-१ अशी मोठी आघाडी घेतली होती आणि तीच निर्णायक ठरली. उत्तरार्धात त्यांच्या सलीम शेख याने आपल्या जोरदार चढायांनी शिव मराठा संघाचा बचाव खिळखिळा केला पण त्याचे हे प्रयत्न पुरेसे ठरले नाहीत आणि त्यांचे आव्हान उपांत्य फेरीतच आटोपले. महिला गटातून चेंबूर क्रीडा केंद्र आणि ओम नवमहाराष्ट्र मंडळ या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. चेंबूर क्रीडा केंद्र संघाने आक्रमण, बचाव आणि उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या बळावर सन्मित्र क्रीडा मंडळ विरुद्ध ४४-१४ असा आरामात विजय मिळविला. त्यांच्या भाग्यश्री जाधवने एका चढाईत ४ गुण तर ऋतुजा गोवर्धने हिने एका चढाईत ३ गुणांची कमाई करीत संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. सन्मित्र संघातर्फे आरती यादव हिने एका चढाईत ३ गुण मिळविले तर दीपलक्ष्मी लेंगार हिने उत्तम पकडी केल्या. ओम नवमहाराष्ट्र मंडळ आणि वंदे मातरम या दोन संघांमधील लढत अगदीच एकतर्फी ठरली. करिष्मा म्हात्रे आणि ऐजीता यांच्या जोरदार चढाया प्रतिस्पर्धी संघ थोपवू शकला नाही आणि उपांत्य फेरीतील त्यांचा प्रवेश सुकर झाला.
कबड्डी : कुमार गटातून शिव मराठा स्पोर्ट्स क्लबची अंतिम फेरीत धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 17:13 IST