सामान्यपणे आपण बघतो की, दुर्मिळ जुन्या वस्तूंच्या लिलावात अनेक खास वस्तूंना कोट्यवधींची किंमत मिळते. जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांना दुर्मिळ प्राचीन वस्तू संग्रही ठेवण्याची आवड असते. त्यासाठी ते कितीही किंमत देण्यास तयार असतात. पण एखाद्या खेकड्याला तुम्ही कधी लाखो रूपये किंमत मिळाल्याचं ऐकलं किंवा पाहिलंय का? नाही ना...पण एका खेकड्याला लिलावात तब्बल ३२ लाख ६६ हजार रूपये किंमत मिळाली आहे.
हा खेकडा आतापर्यंतचा जगातला सर्वात महागडा खेकडा ठरला आहे. या खेकड्याचा लिलाव नुकताच जपानच्या टोट्टरीमध्ये करण्यात आला. या खेकड्याची खासियत म्हणजे हे खेकडे केवळ बर्फात आढळतात आणि या खेकड्यांना क्रस्टेशिअन खेकडा म्हटलं जातं.
जपानमध्ये हिवाळ्याला सुरूवात होताच सी फूडचे लिलाव सुरू होतात. लोक या लिलावांची आतुरतेने वाट बघत असतात. या लिलावांमध्ये टूना मासा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.
यावेळी या खेकड्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या सर्वात महागड्या खेकड्याचं वजन १.२ किलोग्रॅम आणि याची लांबी १४.६ सेंटीमीटर आहे. स्थानिक अधिकारी शोता इनामोना म्हणाले की, खेकड्यासाठी लावण्यात आलेली ही बोली ऐकून ते हैराण झाले. याआधी गेल्यावर्षी एका खेकड्यावर १३ लाख रूपयांची बोली लावण्यात आली होती. ही त्यावेळची सर्वात मोठी बोली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा खेकडा एका स्थानिक दुकानदाराने खरेदी केला आणि हा खेकडा जपानच्या ग्लिटजी गिंजा जिल्ह्यातील एका मोठ्या रेस्टॉरन्टला दिला जाणार आहे. याआधी एका उद्योगपतीने वर्षाच्या सुरूवातीला एक टूना मासा २२ कोटी रूपयांना खरेदी केला होता.