हल्ली सरकारकडून बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर उभारण्यात येणाऱ्या रस्ते आणि महामार्गांवर टोल नाके सर्रास दिसून येतात. या रस्त्यांवरून ये जा करणाऱ्या वाहनांकडून टोल नाक्यांवर ठरावीक रक्कम टोल म्हणून घेतली जाते. तसेच त्या माध्यमातून रस्त्याच्या बांधकामासाठी आलेला खर्च वसूल केला जातो. दरम्यान, असा एखादा टोल नाका बंद असेल तर किंवा तिथली यंत्रणा बिघडलेली असेल तर त्यावेळेत ये जा करणाऱ्या वाहनांना टोल न भरता पुढे जाता येते. तसेच लोकही नंतर टोलची रक्कम भरण्याची तसदी घेत नाहीत. मात्र जपानमध्ये टोल नाका बंद असताना तिथून प्रवास केलेल्या हजारो लोकांनी जे काही केलं त्याबाबत वाचून तुम्ही अवाक झाल्याशिवाय राहणार नाही. जपानमध्ये एक टोल नाका बिघाडामुळे ३८ तास बंद होता. तरीही इथून ये जा केलेल्या सुमारे २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे टोल भरला.
ही घटना एप्रिल २०२४ मध्ये घडली होती. जपानमधील सर्वात वर्दळीच्या रस्त्यांवर वापरण्यात येणारी ईटीसी (इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन) सिस्टिम ३८ तास बंद पडली होती. त्यामुळे टोकियो, कानागावा, यामानाशी, नागानो , शिजुओका, आइची, गिफू आणि मिएसारख्या एकूण १०६ टोल प्लाझांना फटका बसलला होता. ही यंत्रणा विस्कळीत झाल्यानंतर वाहतूक सुरळीत राहावी यासाठी प्रशासनाने टोलचे दरवाजे खुले केले होते.
दरम्यान, ईटीजी सिस्टीम फेल झाल्यानंतरही या मार्गावरून सुमारे ९.२ लाख वाहनांनी ये जा केली. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे त्यापैकी सुमारे २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणा दाखवत स्वत: पुढाकार घेऊन ऑनलाइन पद्धतीने टोल भरला. या मार्गांचं संचालन करणाऱ्या नेक्सो सेंट्रल या कंपनीने सांगितले की, ८ एप्रिल रोजी रात्री दहा वाजेपर्यंत हजारो लोकांनी टोलचा भरणा केला होता. नंतर या वेळेत या मार्गावरून जी वाहने गेली त्यांना टोल माफ करण्यात येईल, अशी घोषणा कंपनीने केली. तसेच ज्यांनी प्रामाणिकपणे टोल भरला त्यांची रक्कम त्यांना परत दिली जाईल, असे कंपनीने सांगितले. आता या प्रामाणिक व्यक्तींचं सोशल मीडिायवरून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.