History of Teeth Whitening: दात स्वच्छ करण्याची सवय ही हजारो वर्षांपासून चालत आली आहे. पूर्वी लोक दात चमकवण्यासाठी वेगवेगळे उपाय करत होते. कधी कधी तर विचित्र पद्धतीनंही दात साफ करायचे. पांढरे, चमकदार दात नेहमीच श्रीमंतीचं प्रतिक मानले जातात. अशात आज आपण हे जाणून घेऊ की, जुन्या काळात लोक दात साफ करण्यासाठी काय काय करत होते.
प्राचीन काळात लोक आजप्रमाणे टूथब्रश आणि पेस्टचा वापर करत नव्हते. शाइन डेंटल क्लीनिक यूके यांच्यानुसार, लोक तेव्हा "च्यू स्टिक" म्हणजे झाडाच्या बारीक फांदीचा वापर करून दात चमकवत होते. अवाक् करणारी बाब म्हणजे आजही काही भागांमधील लोक अशाप्रकारे झाडाच्या फांदीचा वापर दात स्वच्छ करण्यासाठी करतात. यूनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉयचे प्रोफेसर क्रिस्टीन डी वू म्हणाले की, काही च्यू स्टिक बॅक्टेरिया मारणाऱ्या तत्वांपासून बनवलेल्या होत्या, ज्या दातांना कीड लागण्यापासून आणि हिरड्यांच्या समस्यांपासून वाचवत होत्या. काही स्टिकमध्ये फ्लोराइडही असतं, जे दात मजबूत करतात.
प्राचीन इजिप्तमध्ये अनोखी पद्धत
प्राचीन इजिप्तमधील लोक दात स्वच्छ करण्यासाठी वेगळाच जुगाड करायचे. त्यांनी ज्वालामुखीतील दगड बारीक करून त्यात वाइन व्हिनेगर टाकून फांदीच्या मदतीनं दातांवर घासलं होतं. हे मिश्रण दातांवरील डाग दूर करण्यास फायदेशीर होतं.
रोमन लोकांचा विचित्रपणा
पहिल्या शतकात रोमन लोक दात स्वच्छ करण्यासाठी प्राणी किंवा मनुष्यांच्या लघवीचा वापर करत होते. लघवीमध्ये अमोनिया असतं, जे ब्लीचिंग आणि स्वच्छता करतं. हे लोक पोर्तुगालवरून मूत्र मागवत होते, जे इतकं लोकप्रिय होतं की, त्यावर टॅक्सही लागत होता.
मध्य युगात काय झालं?
१४ व्या शतकात लोक आपले दात न्हाव्यांना दाखवत होते. न्हावी दात फाइलनं घासत होते आणि आम्लीय मिश्रण लावून चमकवत होते. यामुळे दात पांढरे होते होते. मात्र, दातांवरील मजबूत थर खराब होत होता, ज्यामुळे दात लवकर कीडत होते. काही लोक दातांसाठी मध, जळालेलं मीठ, व्हिनेगर, कासवाचं रक्त किंवा कडूलिंबाचा वापर करत होते. आश्चर्याची बाब म्हणजे प्राचीन काळातील लोकांचे दात खूप मजबूत होते. २ हजार वर्ष जुन्या एका स्मशानभूमीत सापडलेल्या दातांपैकी केवळ १ टक्के दातांनाच कीड लागली होती. याचं कारण त्यांचं खाणं-पिणं होतं. ते जास्त मांस खात होते आणि कार्बोहायड्रेट कमी खात होते. जेव्हा लोक शेती करू लागले तेव्हा धान्य जास्त खाऊ लागले. तेव्हा तोंडात बॅक्टेरिया वाढले, जे दातांचं नुकसान करत होते.