असे अनेक लोक असता ज्यांना ते हयात असताना अजिबातच ओळख मिळत नाही. त्यांनी इतकी मोठी कामे केलेली असतात पण ते कधी प्रकाशझोतात येतच नाहीत. त्यांच्या निधनानंतर त्यांना जगभरात ओळख मिळते. अशीच ही वरील फोटोतील व्यक्ती आहे. ही व्यक्ती नसती तर कदाचित आजचे हे जग बेचिराख झालं असतं. मात्र, या व्यक्तीमुळे कोट्यवधींचे जीव वाचले. जाणून घेऊ नेमकं काय झालं होतं.
कोण आहे ही व्यक्ती?
जगाला वाचवणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे स्टॅनिस्लाव्ह पेट्रोव्ह. आर्मीच्या विश्वात या व्यक्तीला 'The Man Who Saved The World, अशी ओळख आहे. स्टॅनिस्लाव्ह पेट्रोव्ह हे रशियाच्या आर्मीत लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत होते. २०१७ मध्ये त्यांचं निधन झालं. पण त्यांच्या निधनाची बातमी जगासमोर येण्याला ४ महिने वेळ लागला. स्टॅनिस्लाव्ह यांच्या जीवनावर सिनेमा करणारे जर्मन फिल्ममेकर कार्ल शूमाकर यांनी त्यांच्या निधनाची बातमी समोर आणली.
त्यांनी जगाला कसं वाचवलं?
ही घटना अमेरिका आणि रशियात शीतयुद्धाच्या काळातील आहे. २६ सप्टेंबर १९८३ हा तो दिवस! पेट्रोव्ह यांनी प्रसंगावधान दाखवत जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या दरीत जाण्यापासून वाचवले होते. केवळ एका निर्णयामुळे त्यावेळी अमेरिका आणि रशियातील संभाव्य अणुयुद्ध टळलं होतं. कदाचित ते नसते तर या दोन देशांमध्ये युद्ध होऊन जग बेचिराख झालं असतं.
नेमकं काय झालं होतं?
झालं असं होतं की, पेट्रोव्ह रशियाच्या आण्विक सूचना केंद्रावर कार्यरत होते. पेट्रोव यांची शिफ्ट काही वेळानंतर संपणार होती. तेवढ्यात रडारच्या स्क्रीनवर चुकून अलार्म वाजला. अमेरिकेने डागलेले क्षेपणास्त्र रशियाच्या राजधानी मॉस्कोच्या दिशेने येत असल्याची सूचना मिळाली.
मात्र, पेट्रोव्ह यांनी अमेरिका असं करणार नाही, असा विश्वास दाखवला. त्यांनी ही सूचना बाहेर प्रसिद्ध करण्यास मनाई केली. पण तेवढ्यात अमेरिकेने पाच क्षेपणास्त्रे डागल्याची आणखी एक सूचना मिळाली. तरी सुद्धा ते डगमगले नाहीत. पेट्रोव्ह हे त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले आणि ही सूचना चुकीची असल्याचे वरिष्ठांना सांगितले.
ते इतक्यावरच ते थांबले नाही. त्यांनी रडार ऑपरेटरला फोन केला आणि सांगितले की पूर्वसूचना यंत्रणेत काहीतरी बिघाड आहे. नंतर तपास केला असता पेट्रोव्ह यांनी दिलेली माहीत योग्य असल्याचं लक्षात आलं. रशियाच्या उपग्रहांनी सूर्यकिरणांच्या ढगांतून होणाऱ्या परावर्तनालाच क्षेपणास्त्र समजून सूचना पाठवल्या होत्या. रडार यंत्रणेत खरोखरच बिघाड होता. पेट्रोव्ह यांनी दाखवलेल्या याच प्रसंगावधानामुळे तिसरे महायुद्ध टळले. पण या व्यक्तीला आजही जगात हवी ती ओळख नाही.