लहान मुलं त्यांच्या निरागसपणामुळे कधी काय करतील हे सांगता येत नाही. मात्र याच निरागसपणातून लहान मुलांनी केलेल्या उचापती कधी कधी त्यांच्या कुटुंबीयांना खूप महागात पडतात. अशीच एक घटना चीनमध्ये घडली आहे. येथील शानडोंग प्रांतातील एका ८ वर्षीय मुलाने केलेल्या कृत्याची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या मुलाने कपाटामधून त्याच्या आईचा सोन्याचा नेकलेस चोरून तो छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये तुकड्यांमध्ये कापला आणि आपल्या शाळेतील मित्रमैत्रिणींना फ्रेंडशिप गिफ्ट म्हणून वाटला. जवळपास महिनाभरापर्यंत या गोष्टीची कुणकुण कुणालाही लागली नाही. मात्र जेव्हा सत्य परिस्थिती समोर आली तेव्हा आई त्याच्या निरागसपणावर हसत हसत रागावली. तर वडिलांनी मुलाला त्याने केलेल्या चुकीचे परिणाम समजावण्याचा प्रयत्न केला.
याबाबत अधिक माहिती देताना सदर मुलाच्या आईने सांगितले की, ‘माझ्या मुलीने तिच्या भावाच्या मित्राकडे एक सोन्याचा तुकडा पाहिला होता. हा तुकडा त्याला तिच्या भावाने दिला होता असे त्या मुलाने तिला सांगितले. त्यानंतर तिने याबाबत मला माहिती दिली. मग मी माझ्या मुलाकडे विचारणा केली असता त्याने तो सोन्याचा तुकडा माझ्या नेकलेसमधलाच असल्याचे कबूल केले’. त्यानंतर या आई-वडिलांनी घरातील सीसीटीव्हीची पडताळणी केली. त्यात हा मुलगा आईच्या कपाटातून गुपचूप सोन्याचा नेकलेस काढताना दिसला. तसेच त्यानंतर त्याने या नेकलेसचे तुकडे करून ते मित्रमैत्रिणींना वाटले.
जेव्हा या नेकलेसच्या किमतीची तुला कल्पना आहे, असे आईने त्याला विचारले तेव्हा त्याने मला काहीच माहिती नसल्याचे सांगितले. तेव्हा या मुलाच्या वडिलांनी रागाच्या भरात त्याला मारहाण केली. हा नेकलेस सुमारे ८ ग्रॅमचा होता. दरम्यान, चीनमध्ये ८ वर्षांवरील मुलांना मर्यादित नागरिक क्षमतेचं मानलं जातं. त्यामुळे अशा मुलांनी केलेल्या कृत्यांची जबाबदारी आई-वडिलांची असते. तसेच आई वडिलांच्या सहमतीनेच अशा मुलांना शिक्षा दिली जाऊ शकते. एवढंच नाही तर मुलांना मारहाण करणं हा बालसुरक्षा कायद्यानुसार गुन्हा मानला जातो.
दरम्यान, आता हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तसेच लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. ‘याला आताच समजवा नाही तर एकेदिवशी तुमचं घर विकून टाकेल’, अशी प्रतिक्रिया एकाने व्यक्त केली आहे. तर ‘त्याने या नेकलेसचे तुकडे मुलींना दिले असतील तर ते शोधण्याचा प्रयत्न करू नका. कदाचित त्यामधील कुणी भविष्यात तुमची सून बनू शकेल’, अशाी गमतीदार प्रतिक्रिया आणखी एकाने व्यक्त केली आहे.