पाकिस्तानचा 'हल्क' म्हणून ओळखला जाणारा २७ वर्षीय अरबाब खिजर हयात एक वेटलिफ्टर आहे. त्याला खान बाबा या नावानेही ओळखले जाते. त्याचं वजन ४४४ किलोग्रॅम आहे. पण आता त्याचं हे वजनच त्याच्यासाठी अडचणीचं कारण ठरलं आहे. झालं असं की, त्याला त्याच्या साइजची नवरीच मिळत नाहीये. त्याची अशी अपेक्षा आहे की, त्याची नवरी साधारणपणे कमीत कमी १०० किलो वजनाची असावी. जेणेकरून जोडा दिसायला व्यवस्थित असेल.
अरबाब खैबर पख्तूनख्वा जिल्ह्यातील मरदान येथे राहणारा आहे. तो सांगतो की, 'माझ्या वडिलांना वाटतं की मी आता लग्न करावं. त्यांना नातवंडं हवी आहेत. पण मला अजूनपर्यंत योग्य मुलगी मिळाली नाही. गेल्या सात वर्षापासून मी प्रेमाच्या शोधात आहे. इतक्या दिवसात मी जवळपास २०० ते ३०० मुली बघितल्या. पण त्यांचं वजन फारच कमी होतं'.
अरबाबच्या परिवाराची अट ही आहे की, नवरीची उंची सहा फूट चार इंच असावी. कारण अरबाबची उंची सहा फूट सहा इंच आहे. त्यासोबतच मुलीला चांगलं जेवण तयार करता आलं पाहिजे. अरबाबची रोजचा आहार १० हजार कॅलरी आहे. तो रोज नाश्त्यात ३६ अंडी खातो. इतकेच नाही तर रोज त्याला चार कोंबडे आणि पाच लिटर दूध लागतं.
हयात म्हणाला की, त्याचं जगातला सर्वात शक्तीशाली व्यक्ती होण्याचं स्वप्न आहे. यासाठी त्याने त्याचं वजन आधीपासूनच वाढवणं सुरू केलं होतं आणि अजूनही ते काम सुरूच आहे. त्याने सांगितले की, त्याला कोणताही आजार नाही आणि तो त्याच्या वजनासोबत पूर्णपणे फिट आहे.
अरबाब पहिल्यांदा तेव्हा चर्चेत आला होता जेव्हा त्याने एक ट्रॅक्टर दोरीला बांधून खेचला होता. त्यावेळी त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याने दावा केला होता की, २०१२ मध्ये त्याने जपानमध्ये ५ हजार किलो वजन उचललं होतं. त्याने असाही दावा केला होता की, त्याला WWE मेडल मिळालं आणि त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं आहे. पण त्याचे हे दावे कधी सिद्ध होऊ शकले नाहीत.