आज ऑनलाइन पेमेंट, ही एक काळाची गरज बनली आहे. मात्र, केवळ २०० रुपयांचे ऑनलाइन पेमेंट फेल झाल्याने एका व्यक्तीचे मोठे गुपित समोर आले आहे. हे गुपित त्याच्या पत्नीला समजल्यानंतर, ती त्याला सोडून गेली आहे. त्याचा संसार मोडण्याच्या उंबरठ्यावर आला आहे. तो आता न्यायालयाच्या खेट्या घालत आहे.
असं आहे संपूर्ण प्रकरण...!खरे तर हे प्रकरण चीनचे आहे. येथेल एक युवक ग्वांगडोंग प्रांतातील यांगजियांग येथील एका औषधाच्या दुकानात गर्भनिरोधक ओषधी खरेदी करण्यासाठी पोहोचला. त्याने मोबाईलच्या सहाय्याने १५.८ युआन (सुमारे २०० रुपये) चे ऑनलाइन पेमेंट केले आणि औषधे घेऊन गेला. मात्र, सिस्टिममधील काही त्रुटीमुळे त्याने केलेले ऑनलाइन पेमेंट अयशस्वी अथवा फेल झाले आणि संबंधित युवकाला त्याच्या नशिबाने धोका दिला. साउथ चायना मॉर्निंग पोस्टने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.
दुकानदाराच्या फोन अन् गुपित उघडं पडलं -गर्भनिरोधक गोळ्यांचे ऑनलाइन पेमेंट अयशस्वी झाल्याची माहिती दुकानदाराला मिळताच, त्याने संबंधित खात्याशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन केला. मात्र हा फोन संबंधित युवका ऐवजी त्याच्या पत्नीने उचलला. यानंतर दुकानदाराने त्याच्या पत्नीकडेच पैशांचा तकादा लावत संपूर्ण प्रकारच सांगून टाकला.
पतीने गर्भनिरोधक गोळ्या खरेदी केल्याचे ऐकून पत्नीला धक्काच बसला, कारण तिला, अशा गोळ्याची काहीही गरज नव्हती. या फोन कॉलमुळे तिला तिच्या पतीचे अनैतिक संबंध समजले. आता ती त्याला सोडून गेली आहे. तिने त्याला लग्न मोडण्याची धमकी देत, पोलिसांतही तक्रार केली आहे.
यानंतर, ऑनलाइन पेमेंट अयशस्वी झाल्याने आपले प्रेमसंबंध उघड झाल्यानंतर, संबंधित युवकाने वकिलाशी संपर्क साधून संबंधित दुकानदाराविरुद्ध कायदेशीर कारवाईसंदर्भात सल्ला घेतला आहे. दुकानदाराने आपल्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप केला असून, दोन कुटुंब तुटले आहे. त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, असे संबंधित युवकाने म्हटले आहे.
काय म्हणाले वकील? -हेनान झेजिन लॉ फर्मचे संचालक फू जियान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कायदेशीररित्या संबंधित व्यक्ती फार्मसीविरुद्ध कारवाई करू शकतो, मात्र, हे सिद्ध करणे थोडे कठीण आहे. त्याचे लग्न मोडण्याचे खरे कारण, त्याने त्याच्या पत्नीशी केलेली फसवणूक आहे. त्याला त्याच्या कृत्याची जबाबदारी तर घ्यावीच लागेल.