भिवंडी : तालुक्यातील डुंगे गावात आठ दिवसांपासून माकडाने धुमाकूळ घालून सहा जणांना चावून जखमी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी भिवंडी वनक्षेत्रपाल व अधिकार्यांकडे ग्रामस्थांनी तक्रार केल्याची माहिती दिली असली तरी वनखात्याने त्याबाबत कानावर हात ठेवले आहे. तालुक्यातील डुंगे गावालगत खाडीकिनारी तिवरांच्या झाडीत राहणार्या माकडाच्या नर व मादीने आठ दिवसांपूर्वी डुंगे गावात प्रवेश केला. ग्रामस्थांनी कुतूहलापोटी त्यांना खायला दिले. परंतु ते माणसाळण्याऐवजी ते माणसांवर हल्ला करू लागले. त्यापैकी नर माकड सध्या गायब असून माकडीण सध्या सकाळ-दुपार गावांत शिरून नागरिकांवर हल्ला करून सायंकाळी तिवरांच्या झाडीत लपते. तिने केलेल्या हल्ल्यात अनंत गोपीनाथ पाटील,जीवन कोल्या पाटील, प्रल्हाद एकनाथ पाटील,नरेश एकनाथ पाटील,नरहरी बुधाजी तरे,चंद्रकांत हेंदर भगत हे सहाजण जखमी झाले. याप्रकरणी माजी सरपंच गणेश पाटील यांनी वन अधिकार्यांशी संपर्क साधला असता, आमच्याकडे पिंजरा नसल्याने तुम्हीच माकडास पकडून द्या, असा उलट सल्ला दिल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. यापूर्वी माणकोली गावांत आलेल्या माकडास नॅशनल पार्कच्या कर्मचार्यांनी पकडून नेले होते. मात्र येथील वन अधिकारी कोणतीही तसदी घेण्यास तयार नाही, असे गावकर्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
माकडाचा सहा जणांना चावा
By admin | Updated: May 26, 2014 02:26 IST