सगळ्यांच्याच जीवनात रोज वेगवेगळ्या घटना घडत असतात. बरेच लोक या घटनांकडे दुर्लक्ष करतात. काही गोष्टी आपण फारच सामान्य समजून सोडून देतो. जसे की, भाजी कापताना चाकूनं बोट कापणं, एखाद्या उत्पादनामुळं अॅलर्जी होणं इत्यादी इत्यादी. पण सगळेच लोक असे नसतात. काही लोक इतके जागरूक असतात की, ते अशा बारीक पण महत्वाच्या गोष्टी कोर्टात घेऊन जातात. आज अशाच एका व्यक्तीबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तुम्हीही अनेकदा पाहिलं असेल की, शेव्हिंग करताना ब्लेडमुळे त्वचा कापली जाते. त्यानंतर लोक त्यावर काहीतरी लावून आपल्या कामात पुन्हा बिझी होतात. निक सिल्वेर्थन नावाच्या एका व्यक्ती हा प्रकार कोर्टात नेला. त्यानं रेजरमुळे कापल्यानंतर निघालेल्या रक्ताच्या एका एका थेंबाचा हिशेब लावला आणि रेजर कंपनीवर केस केली.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, निक सिल्वेर्थन नावाच्या ४८ वर्षीय व्यक्तीनं सुपरमार्केटमधून एक रेजर खरेदी केलं होतं. घरी गेल्यावर त्यानं त्याचा वापर केला. शेव्हिंग करत असताना त्याचा गाल कापला गेला. ज्यामुळे त्याचं रक्त वाहू लागलं होतं. मात्र, या व्यक्तीनं हे हलक्यात घेतलं नाही. त्यानं रेजर चेक केलं तर ते जरा खराब होतं. ज्यामुळे त्याची त्वचा कापली गेली. मग काय निकनं रेजर कंपनीविरोधात कोर्टात केस केली आणि नुकसान भरपाईची मागणी केली.
लंडनमध्ये राहणाऱ्या निकनं सांगितलं की, घाव मोठा होता आणि २० मिनिटं रक्त वाहत होतं. तो ३० वर्षांपासून शेव्हिंग करत आहे आणि कधीही त्याच्यासोबत असं झालं नाही. अशात हे स्पष्ट होतं की, रेजरमध्ये गडबड होती. निकनं रेजरबाबत Express Solicitors ला सपंर्क केला. त्यांनी रेजर बनवणारी जगातील नंबर वन कंपनी Wilkinson Sword सोबत संपर्क केला. जेव्हा रेजरची टेस्ट करण्यात आली, तेव्हा साधारण महिनाभरानंतर निकला नुकसान भरपाई म्हणून ६,२५० डॉलर म्हणजे ५ लाख रूपये मिळाले. कुणी याची कल्पनाही केली नसेल की, रेजरनं कापल्यानंतर कुणाला ५ लाख रूपये नुकसान भरपाई मिळेल.