न्यूयॉर्क- पत्रकार किंवा एखाद्या वृत्तवाहिनीत अँकर म्हणून काम करणं खूपच आव्हानात्मक काम असतं. त्यांना नेहमी सतर्क राहावं लागतं. तसेच कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारीही असावी लागते. प्रत्येक विषयाबद्दल ज्या प्रमाणे न्यूज अँकरला माहिती असणं महत्त्वाचं असतं त्याच प्रमाणे स्टुडिओमध्ये बसून बातमी सांगताना त्याच अँकरला चेहऱ्यावर तितकीच प्रसन्नता ठेवणं महत्त्वाचं असतं. तुमचा मूड हा चेहऱ्यावर दिसू न देता प्रत्येक बातमी तितक्याचं चोखपणे सांगावी लागते. पण, कधीकधी आपली भूमिका चोखपणे निभावत असताना अँकर्संना अवघड परिस्थितीचाही सामना करावा लागतो. न्यूयॉर्कमध्ये नुकतीच अशी एक घटना घडली. तेथिल एका वृत्तवाहिनीतील नेटली पास्कक्व्रेला ही महिला अँकर एका लाईव्ह चर्चासत्राचं सूत्रसंचालन करत होती. नेटली ही गर्भवती होती. या लाईव्ह कार्यक्रमात तिच्या पोटात अचानक कळा येऊ लागल्या.
ट्विटरची वाढविलेली शब्दमर्यादा असा या चर्चेचा विषय होता. तिला लाईव्ह टेलिकास्ट सुरु असताना लेबर पेन सुरु झालं. पण, आपला शो संपेपर्यंत ती काहीच करु शकत नव्हती. विशेष म्हणजे तिने पुढील काही वेळ या कळा अशाच हसतमुख चेहऱ्याने सहनही केल्या. गेल्या आठवड्यात मंगळवारी रात्री अकरा वाजता त्या वृत्तवाहिनीवर चर्चासत्र सुरू असताना नेटलीला लेबर पेनिंग सुरू झालं. ब्रेकमध्ये तिने आपल्या सहकाऱ्याला आपल्याला कळा येत असल्याचे सांगितलं. त्यानंतर तिच्या सहकाऱ्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. अखेर १३ तासांच्या उपचारानंतर तिने मुलाला जन्म दिला. यावेळी तिचा पती जॅमिन हा हॉस्पिटलमध्ये उपस्थित होता. आपल्या या बाळाचं नाव जॅमिन जेम्स ठेवल्याचंही तिने सांगितलं.
आपल्या या गोंडस बाळाचा फोटो या जोडप्याने ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहेत. 'सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे आमचं बाळ लवकर या जगात आलं, शुभेच्छा देणाऱ्या सगळ्यांचे धन्यवाद', असं कॅप्शन नेटलीने फोटो शेअर करताना दिलं आहे. नेटली सोबत त्या न्यूज चॅनेलमध्ये तिच्यासोबत काम करणाऱ्या सगळ्यांसाठीच हा सगळा प्रसंग अतिशय वेगळ्या प्रकारचा होता. आपल्यातील एका अँकरला अशाप्रकारे लाईव्ह असताना प्रसूती कळा येणं आणि मूल झाल्याची बातमी त्यांनी आपल्या चॅनलवरील बुलेटिनमध्ये दिली.