Job replay in 60 seconds: हल्लीच्या स्पर्धेच्या युगात नवीन नोकरी शोधणं हे कायमच कठीण काम असतं. काही वेळा नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर कंपन्या अनेक आठवडे किंवा महिने प्रतिसाद देत नाहीत, तर काही वेळा काही दिवसातच रिप्लाय मिळतो. पण तुम्ही नव्या नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर अवघ्या ६० सेकंदातच तुम्हाला रिप्लाय आला असेल तर... असाच एक प्रकार एका तरुणासोबत नुकताच घडला. त्याने सोशल मीडियावर यासंदर्भातील माहिती दिली. त्याने घडलेला प्रकारही सांगितला आणि त्याच्या नोकरीचे पुढे काय झाले याबद्दल माहिती दिली.
६० सेकंदात आला मेल
तरुणाने रेडिटवर पोस्ट लिहून आपला अनुभव शेअर केला. तो म्हणाला की त्याने एका कंपनीत कस्टमर सक्सेस मॅनेजर या पदासाठी अर्ज केला होता. अर्ज पाठवल्यानंतर अवघ्या ६० सेकंदात म्हणजेच एका मिनिटात त्याला समोरच्या कंपनीकडून ई-मेल आला. त्या ईमेल मध्ये लिहिण्यात आले होते की, 'तुमचा अर्ज नाकारला जात आहे.' या अतिजलद रिप्लायने तरुणालाही धक्काच बसला. त्याने त्याच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, अर्ज करण्यापूर्वी मी सर्व आवश्यक त्या बाबी तपासल्या होत्या. माझी पात्रता, अनुभव, पद आणि अमेरिकेत काम करण्याची परवानगी या सर्व गोष्टी बिनचूक होत्या. अशा परिस्थितीत मला ती नोकरी नाकारण्यात आली.
नोकरी नाकारण्याचे कारण काय?
तरूणाने आपल्या रेडिटच्या पोस्टमध्ये नोकरी नाकारल्याचे कारणही स्पष्ट केले आहे. कंपनीने त्याला लिहिलेल्या मेलमध्ये म्हटले आहे की तुमचा अर्ज नाकारण्यात आला आहे कारण ज्या पदासाठी आम्ही अर्ज मागवले होते, ती जागा आता रिक्त नाही. जागा भरण्यात आली असल्याने तुमचा अर्ज नाकारला जात आहे. तरूणाने याबाबतही प्रश्न उपस्थित केला. तरूणाचे असे म्हणणे पडले की, जर पद आधीच भरले गेले असेल, तर मग नोकरीची पोस्टिंग अजूनही का सुरू होती? त्यांनी ती जाहिरात बंद का केली नाही.
A lot can happen UNDER A MINUTE. Yes, one minute.byu/Delicious-Demand-495 inrecruitinghell
ATS प्रणालीवर प्रश्न उपस्थित केले
तरूणाच्या पोस्टनंतर अनेक जण म्हणाले की, हा प्रकार ATS मुळे झाला असावा. अनेक कंपन्या हल्ली ATS (Applicant Tracking System) वापरतात, जी आपोआप अर्ज स्कॅन करते आणि तो त्वरित नाकारू शकते. ही प्रणाली अनेकांना मान्य नाही कारण यात उमेदवार खरंच पात्र आहे की नाही, याचा निर्णय ठरलेल्या निकषांवर तंत्रज्ञान घेते. हा भाग काही अंशी अन्याय करणारा असल्याचे अनेकांचे मत आहे.