(Image Credit : internationalopticians.com)
सामान्यपणे ऑफिसेसमध्ये कॉम्प्युटरसमोर जास्तीत जास्त वेळ बसून काम करणारे लोक चष्मा लावतात. त्यांची इच्छा नसली तरी सुद्धा डोळ्यांची काळजी घेण्यासाठी अनेकांना चष्मा लावावा लागतो. पण जगात एक असाही देश आहे, जिथे कंपन्यांमध्ये महिलांवर चष्मा घालण्यास बंदी घातली आहे. बरं याचं कारणंही फारच विचित्र आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जपानमध्ये ऑफिसमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या चष्मा लावण्यावर बंदी घातली आहे. पण पुरूषांवर अशाप्रकारची कोणतीही बंदी नाही. इथे एअरलाइन्सपासून ते रेस्टॉरन्टपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये अशा अनेक खाजगी कंपन्या आहेत, ज्यांनी महिलांच्या चष्मा वापरून काम करण्यावर बंदी घातली आहे.
रिपोर्ट्सनुसार, जपानच्या कंपनीने महिला कर्मचाऱ्यांना असेही सांगितले आहे की, त्यांनी मेकअप करूनच ऑफिसमध्ये यावं. त्यासोबतच कंपन्यांमधील महिलांना वजन कमी करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
कंपन्यांचं यावर असं मत आहे की, ऑफिसमध्ये महिला चष्मा घालून आल्या तर याने त्यांच्या सुंदरतेवर प्रभाव पडतो. ज्यामुळे क्लाएंट्सवर चुकीचा प्रभाव पडतो. तसेच त्यांचं मत आहे की, याने कंपन्यांचा व्यवसाया प्रभावित होतो.
कंपन्यांच्या या विचित्र नियमांना महिलांना जोरदार विरोध केला आहे. ट्विटरवर महिलांनी #glassesareforbidden हा हॅशटॅग वापरून याबाबत अनेक ट्विट केले आहेत.
जपानमध्ये अशाप्रकारचे विचित्र नियम लावण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक कंपन्यांनी महिलांनी हाय हिल्स सॅन्डल घालून येणं बंधनकारक केलं होतं. याविरोधातही महिलांनी आवाज उठवला होता.