प्रेमात लोक काय काय करतात हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल कधी शाहजहांने मुमताजसाठी ताजमहाल बांधला तर कधी कधी मजनू लैलासाठी जगासोबत लढत राहिला. अशातच प्रेमाचं एक अनोखं उदाहरण बघायला मिळालं. एका पतीने त्याच्या पत्नीसाठी विमानासारखं दिसणारं एक सुंदर आणि आलिशान घर तयार केलंय.
पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी पतीने असं घर तयार केलं आहे. ही घटना आहे नायजेरियाची राजधानी अबुजातील. येथील एका व्यक्तीच्या पत्नीला फिरण्याची फारच आवड आहे. जमाल असं या व्यक्तीचं नाव असून त्याने पत्नीची ही आवड डोळ्यासमोर ठेवून अशाप्रकारचं घर तयार करण्याचा विचार केला.
हे स्वप्नातील घरापेक्षा अजिबात कमी नाही. रिपोर्ट्सनुसार, या आलिशान घरात गेस्ट हाऊस, मशीद, स्वीमिंग पूल, गार्डन आणि हिरवीगार झाडे आहेत. एका मुलाखतीत जमाल यांनी सांगितले की, त्यांनी हे विमानासारखं घर यासाठी तयार केलं, जेणेकरून त्यांच्या पत्नीला वाटावं ती सतत प्रवास करत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे आलिशान घर तयार करण्यासाठी साधारण २० वर्षे लागलीत. जमालने हे घर तयार करायला १९९९ मध्ये सुरूवात केली होती. त्यावेळी त्यांचा मुलगा १२ वर्षांचा होता. असेही सांगितले जात आहे की, घराच्या या डिझाइनमध्ये मुलाने देखील त्यांना मदत केली. तसेच जमालने सांगितले की, परिवारासोबतच, देशाविदेशातील लोक या घराकडे आकर्षित होत आहेत.