(Image Credit : diabetestimes.co.uk)
टेक्नॉलॉजीच्या विश्वात सतत काहीना काही नवीन सुरू असतं. ज्यामुळे आपली कामे सोपी होतात. अशाच एका वेगळ्या टेक्नीकचा वापर ब्रिटनमध्ये करण्यात आला आहे. या टेक्नीकचा वापर महिलांना प्रसुतीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी करण्यात आला आहे. या टेक्नीकची सध्या वेगवेगळ्या स्तरातून प्रशंसा केली जात आहे. चला जाणून घेऊ कशाप्रकारे महिलांना प्रसुतीवेळी होणाऱ्या वेदना कमी केल्या जातात.
ब्रिटनमध्ये वेल्सच्या एका रूग्णालयात गर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी एक पाऊल उचललं गेलंय. येथील नॅशनल हेल्थ सर्व्हिसने त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलांना व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट वापरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. यामागे मुख्य उद्देश हा आहे की, गर्भवती महिलांचं प्रसुती कळांवरून लक्ष हटवले जावे किंवा त्यांची वेदना कमी करावी.
त्यासाठी हे हेडसेट सात मिनिटांसाठी गर्भवती महिलेला घालण्यास सांगितले जातात. यादरम्यान व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेटमध्ये त्यांना उत्तर ध्रुवाची लायटिंग, समुद्रात पोहणे, मंगल ग्रहाची सफर आणि पेंग्विंगसोबत असल्याची जाणीव होते. तसेच त्यांना मन शांत करणारं संगीतही ऐकवलं जातं.
आता अशी चर्चा आहे की, हा उपाय वेल्सच्या सर्वच हॉस्पिटलमध्ये लागू केला जाऊ शकतो. कार्डिफच्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये या हेडसेटवर रिसर्चही झाला आहे. यादरम्यान असं आढळलं की, वीआर हेडसेट घातल्याने गर्भवती महिला प्रसुतीवेळी शांत राहिल्या.