सोनपेठ (जि. परभणी) : तालुक्यातील डिघोळ (इ) येथील देवीमंदिराजवळ गुप्तधन काढण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी हाणून पाडला. रविवारी उघडकीस आलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. सोनपेठ पोलिसांनी डॉ. मगरे, सुनील वाटोरे (रा.परभणी), बालचंद शिंदे (रा.डिघोळ) यांच्यासह सहा अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाच्या व फायद्याच्या कामासाठी जायचे म्हणून मिलिंद शेषराव गायकवाड (२५, रा.परभणी) यांना घेऊन डॉ.मगरे, सुनील वाटोरे हे शनिवारी स्कुटीवरुन परळीस गेले. वाटेत रस्त्यावर थांबलेला बालचंद शिंदे याच्यासह हे चौघे दोन वाहनांनी डिघोळ येथील देवी मंदिराजवळ पोहचले. तेथे आणखी सहा जण आधीपासूनच हजर होते. शनिवारी रात्री ८ ते ८.३० च्या सुमारास मंदिरातील देवीची पूजा झाल्यानंतर एका जागेवर लिंबू, उद, नारळ, हळदी-कुंकू या साहित्याचे पूजन करुन या सर्वांनी खोरे व टोपल्यांनी जमीन खोदण्यास सुरुवात केली. ग्रामस्थांना बॅटरीच्या प्रकाश दिसल्याने चोरट्यांच्या संशयावरुन त्यांनी घटनास्थळ गाठले. मोठा जमाव येत असल्याचे पाहताच नऊ जणांनी पळ काढला. मिलींद घटनास्थळाशेजारी लपून बसला होता. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मिलींदने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन खोदण्याचे व पुजेचे साहित्य जप्त केले. घटनेच्या ठिकाणी आपल्यासह दहा जण उपस्थित होते. यातील एकाचा नरबळी देण्यात येणार असावा, असा संशय मिलींदने फिर्यादीत व्यक्त केला आहे. आरोपींच्या शोधासाठी तपास पथके रवाना केल्याचे सोनपेठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नरबळी देण्याचा प्रयत्न हाणून पाडला
By admin | Updated: September 8, 2014 04:26 IST