ऐतराज हा चित्रपट पाहिलाय? राज मल्होत्रा (अक्षय कुमार), प्रिया (करिना कपूर) आणि सोनिया (प्रियंका चोप्रा) या ‘प्रेम त्रिकोणावर’ आधारित हा चित्रपट. सोनिया ही राजची पूर्वीची प्रेयसी. श्रीमंतीच्या हव्यासापायी सोनिया राजला नाकारून एका श्रीमंत व्यावसायिकाशी लग्न करते, तर राज नंतर प्रियाशी लग्न करतो. एके दिवशी राजच्या ऑफिसमध्ये नवीन बॉसची पत्नी म्हणून सोनियाचा प्रवेश होतो. सोनिया पुन्हा राजला आकर्षित करण्याचा प्रयत्न करते, पण आता राज तिला नाकारतो. अपमानित झालेली सोनिया राजवर लैंगिक छळाचा खोटा आरोप करते. केस कोर्टात जाते. नंतर राजची पत्नी प्रिया वकील म्हणून आपल्या नवऱ्याच्या बाजूने उभी राहते आणि सोनियाचं पितळ उघडं पाडते...
चित्रपटाला साजेशी अशीच एक घटना नुकतीच चीनमध्ये घडलीय. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकरी यावरून चर्चेचा किस पाडताहेत. चीनमधील ‘शू’ ही एका बड्या कंपनीची मालकीण. गर्भश्रीमंत. कंपनीतीलच एक कर्मचाऱ्यावर तिचं प्रेम जडतं. या कर्मचाऱ्याचं नाव ‘ही’. पण, हा कर्मचारी आधीच विवाहित. त्याला एक मुलगाही आहे. पण, शू मागे हटायला तयार नसते.
तिला ही याच्याशीच लग्न करायचं असल्यानं ती आपल्या या कर्मचाऱ्याला त्याच्या पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी तगादा लावते. शेवटी ही देखील तिची मागणी मान्य करतो आणि आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी दावा दाखल करतो. घटस्फोटासाठी त्याला आपल्या पत्नीला तीन दशलक्ष युआन (सुमारे ३ कोटी ७२ लाख रुपये) द्यावे लागणार असतात. आता एवढी मोठी रक्कम तो कुठून आणणार? पण, पैशाचा प्रश्न नसतोच. कारण आपल्या या प्रियकराशी लग्न करण्यासाठी शू स्वत:च हे पैसे देणार असते. त्याप्रमाणे ती हे पैसे आपल्या कर्मचाऱ्याला देतेही आणि त्याला आपल्या पत्नीपासून घटस्फोट घ्यायला लावते. सगळं काही शूच्या मनासारखं होतं. शू आणि ही हे दोघंही सोबत राहायला लागतात.
कहाणीत इथे एक नवा ट्विस्ट येतो. सुरुवातीचे काही दिवस तर मजेत जातात. पण, वर्षभरानंतर दोघांत खटके उडायला सुरुवात होते. शूला वाटायला लागतं, आपल्या ज्या कर्मचाऱ्यावर; ही याच्यावर आपण जिवापाड प्रेम केलं, हे प्रेम मिळविण्यासाठी अक्षरश: वाट्टेल ते केलं, त्याच्यावर, त्याच्यासाठी लाखो, करोडो रुपये खर्च केले, पण तो तर आपल्या लायकीचाच नाही! आपण चुकीचा लाइफ पार्टनर निवडला याचा तिला आता पस्तावा व्हायला लागतो. काहीही झालं तरी ती एक यशस्वी ‘व्यावसायिक’! या ‘सौद्यात’ आपल्याला मोठा ‘घाटा’ झाला आहे, हे लक्षात आल्यानंतर ही याला दिलेले पैसे ती परत मागायला सुरुवात करते.
ही मूळचाच फाटका. तो एवढे पैसे कुठून आणणार? कहाणीत पुन्हा नवा ट्विस्ट येतो. आपल्या ‘नवऱ्या’वर खर्च केलेले पैसे परत मिळविण्यासाठी शू कोर्टात जाते. शू ला आपले पैसे परत हवे असतात, तर ही मुळातच कंगाल असतो. त्याच्याकडे आपल्या नव्या बायकोला देण्यासाठी फुटकी कवडीही नसते. तिच्याच पैशांवर तर तो आता जगत असतो! कोर्टानंही ही याची बाजू उचलून धरली आणि शूला काहीही ‘नुकसानभरपाई’ मिळणार नाही, असा आदेश दिला! यावरुन जगभरात मतमतांतरं मांडली जात आहेत..
Web Summary : A wealthy Chinese woman funded her lover's divorce, giving him millions. After marrying, she regretted it and sued for the money back. The court denied her claim.
Web Summary : एक अमीर चीनी महिला ने अपने प्रेमी के तलाक के लिए लाखों रुपये दिए। शादी के बाद उसे पछतावा हुआ और उसने पैसे वापस मांगे। कोर्ट ने उसकी मांग खारिज कर दी।