सोरा ली. कॅलिफोर्नियातील ही ३४ वर्षीय तरुणी. टेक्नॉलाॅजिकल कंपनीत काम करावं, खूप पैसा कमवावा, असं काही तिचं ध्येय नव्हतं; पण कॉलेजमध्ये शिकत असतानाच पैसे कमावायचे नवनवे फंडे तिला सापडत गेले आणि बघता बघता तरुण वयातच ती लखपती झाली. सोरा साधारण घरातली. पोटापुरतं तरी आपल्याला मिळावं तशी नोकरी, कामधंदा मिळावा एवढीच तिची आस होती; पण ध्यानीमनी नसताना ती टेक्नॉलॉजी कंपन्यांत शिरली. वर्षाला ४० हजार डॉलर्सपर्यंत कमावू लागली; पण त्यानंतर दहाच वर्षांत तिचा पगार वार्षिक चार लाख डॉलर्सच्याही वर गेला. आता ती त्यापेक्षाही कितीतरी अधिक कमावते. तिनं आपली नोकरीही आता सोडून दिली आहे.
सोरानं याआधी नेटफ्लिक्स, मेटा आणि टिकटॉकसारख्या कंपन्यांत काम केलं आहे; पण त्यानंतर तिला पैसे कमाईचा एक वेगळाच फंडा सापडला आणि २०२३ पासून कोरियन ब्यूटी ब्रँड्सना अमेरिकेतील निर्माते आणि आउटलेट्स यांच्याशी जोडून देण्याचं काम तिनं सुरू केलं. यातून तिची कमाई प्रचंड वाढली, पण तत्पूर्वी सोरानं एक महत्त्वाचं काम केलं. कॉलेजमध्ये शिकत असतानाच तिनं लहान-मोठे कोर्सेस करणं सुरू केलं. वेगवेगळ्या फिल्डमधल्या वेगवेगळ्या गोष्टी शिकून घेतल्या. त्याचा उपयोग तिला तिच्या करिअरसाठी झाला. सारा म्हणते, विशेषतः तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रात, तुम्ही कॉलेजमध्ये जे शिकत असता, ते बऱ्याचदा तुम्ही शिकत असतानाच कालबाह्य होऊन जातं. तुम्ही कॉलेजमध्ये जे काही शिकलेलं असतं, त्याचा नंतर आपल्याला काडीचाही उपयोग होत नाही.. कारण तंत्रज्ञान खूप वेगानं पुढे गेलेलं असतं आणि आपण ५-१० वर्षे जुुनं काही तरी शिकत असतो. या शिक्षणाचा काय उपयोग? या शिक्षणाच्या जोडीला ताजं, आजच्या घडीला आणि जे उद्याही उपयोगी पडू शकेल असं काही तरी शिकत राहणं अत्यावश्यक असतं.
सोरानं तेच केलं. तिच्या मुख्य शिक्षणापेक्षा या कोर्सेसनीच तिला हात दिला किंवा अनेक गोष्टी तिनं स्वत:हूनच शिकून घेतल्या आणि पैसे मिळवण्याचा मार्ग तिला सापडला. सोरा म्हणते, पैसे कमावणं ही खरंच फार मोठी गोष्ट नाही. पैसे कमवायला फार डोकंही लागत नाही; पण ते कायम मिळवत राहण्यासाठी मात्र तुमच्या मेंदूला तुम्हाला थोडं कामाला लावावं लागतं. सोराच्या खिशात काही पैसे आपोआप येऊन पडायला लागले, यासाठीही तिनं एक युक्ती केली. आपल्या पगारातले बरेच पैसे तिनं स्मार्टपणे गुंतवले आणि त्यातूनही तिची कमाई सुरू झाली.
सोराच्या दृष्टीनं पैसे कमाईचे मुख्य चार फंडे आहेत. ते तुम्ही लक्षात ठेवले, तर तुमचीही तिजोरी कायम भरलेली राहील. पहिला फंडा, तुमचं शिक्षण असं हवं, जे तुम्हाला कोणत्याही फिल्डसाठी ‘फिरवता’ येऊ शकेल. दुसरा फंडा, वेगवेगळ्या जॉबसाठी तुम्हाला जितके म्हणून इंटरव्ह्यूज देता येतील, तितके द्या. त्यातून इतरांना आणि तुम्हालाही नेमकं काय हवं आहे हे कळतं. तिसरा फंडा, अशी काही सोपी स्किल्स शिकून घ्या, जी तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात पैसा मिळवून देईल आणि अखेरचा फंडा.. तुमचा ‘पर्सनल ब्रँड’ ओळखा. तो एकदा तुम्ही ओळखला की मग तुम्हाला पैशाच्या मागे फिरायची गरज नाही. पैसाच तुमच्या मागे पळत येईल..