पुणे : आॅनलाईन पद्धतीने सेवा पुरवठादार कंपनीकडून आॅर्डर घेऊन औषधांचा बेकायदा पुरवठा करणाऱ्या औषध कंपनीला अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. मे. मेडिबिझ फार्मा प्रायव्हेट लिमिटेड असे या कंपनीचे नाव असल्याची माहिती ‘एफडीए’चे सहायक आयुक्त एस. एस. मोहिते यांनी दिली.आॅनलाईन वस्तू खरेदीचे फॅड आता औषधखरेदीमध्येही येत असल्याचे या प्रकरणामुळे स्पष्ट झाले आहे. कायद्यानुसार घाऊक औषध विक्रेत्यांना परवानाधारक विक्रेता अथवा डॉक्टरांना विक्री बिलानेच औषधपुरवठा करणे बंधनकारक आहे. या प्रकरणात, ज्या व्यक्तीला औषध पाहिजे, तिने कॉल सेंटरकडे संपर्क करून औषधांची मागणी केली. कॉल सेंटरने इंटरनेटरवरून आॅनलाईन पद्धतीने सदाशिव पेठेतील मेडिबिझ कंपनीला औषधांची आॅर्डर दिली होती. यासाठी स्कॅन केलेले प्रिस्क्रिप्शन पाठविण्यात आले होते. त्याची कोणतीही शहानिशा न करता मेडिबिझ कंपनीने कॉल सेंटरला औषधांचा पुरवठा केला. डिसेंबर महिन्यात हे प्रकरण उजेडात आले. माहिती मिळताच औषध निरीक्षक दि. का. जगताप यांनी संबंधित कंपनीची तपासणी केली. यामध्ये बेकायदा औषधांचा पुरवठा केला जात असल्याचे दिसून आले होते. (प्रतिनिधी)
आॅनलाईन औषधविक्री केल्याने एफडीएची नोटीस
By admin | Updated: January 31, 2015 01:09 IST