(Image Credit : The Register Citizen)
अल्बानी (अमेरिका) : वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अनेक व्यक्तींना तुम्ही मानद पदवी दिल्या गेल्याचं अनेकदा पाहिलं असेल. पण कधी एखाद्या कुत्र्याला मानद पदवी दिल्याचं तुम्ही ऐकलं नसेल. पण नुकताच एका कुत्र्याचा मानद पदवी देऊन सन्मान करण्यात आलाय. आता कुत्र्याला कशासाठी ही पदवी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर तेच आपण जाणून घेऊ.
ब्रिटनी हाउले या तरुणीला वर्गात असताना कोणत्याही वस्तूची गरज लागली किंवा कोणतीही मदत लागली तर हा कुत्रा तिला मदत करत होता. जर तिला मोबाइल सापडत नसेल तर हा कुत्रा तिला मोबाइल शोधून द्यायचा. इतकेच काय तर जेव्हा ब्रिटनी इंटर्नशिपदरम्यान रुग्णांवर उपचार करत असायची तेव्हाही हा कुत्रा तिच्या आजूबाजूला असायचा.
क्लार्कसन विश्वविद्यालयात ऑक्यूपेशनल थेरपीमध्ये मास्टर डिग्री पूर्ण केल्यावर शनिवारी हाउले तिची डिग्री घेत होती. तेव्हाही हा ग्रिफिन नावाचा कुत्रा तिच्यासोबत होता. हाउले सोमवारी म्हणाली की, 'कॉलेज सुरु झाल्यापासून हा कुत्रा तिच्यासोबत आहे. जे मी केलं ते सगळंच या कुत्र्यानेही केलं आहे'.
पोस्टडॅम न्यूयार्क स्कूलचे बोर्ड ट्रस्टी शनिवारी 'गोल्डन रीट्रिवर' प्रजातीच्या ४ वर्षीय या कुत्र्याचा सन्मान करताना म्हणाले की, हाउलेच्या यशात या कुत्र्याने असाधारण असं योगदान दिलं आहे. सतत तिच्यासोबत राहून या कुत्र्याने तिची मदत केली. वेगवेगळ्या अडचणींचा सामना करणाऱ्या लोकांची मदत करणाऱ्या अशा प्रशिक्षित कुत्र्यांना 'सर्व्हिस डॉग' म्हटले जाते. उत्तर कॅरोलाइनामध्ये विल्सन इथे राहणारी हाउले ही व्हील चेअरच्या मदतीने चालते आणि तिला क्रॉनिक पेनची समस्या आहे. तिला चालता येत नाही.
त्यांनी सांगितले की, ग्रिफिनने दरवाजा उघडण्यापासून, लाइट सुरु करण्यापर्यंत इशारा केल्यावर कोणत्याही प्रकारचं काम करुन देत होता. भलेही ही कामे फार मोठं वाटत नसली तरी हाउलेला भीषण वेदनेचा सामना करावा लागत असे तेव्हा ते तिच्यासाठी महत्त्वाचं होतं. हाउले आणि ग्रिफिनने इंटर्नशिपदरम्यान नार्थ कॅरोलाइनाच्या फोर्ट परिसरात काम केलं. यादरम्यान त्यांनी चालण्या-फिरण्यात समस्या येणाऱ्या सैनिकांची तसेच गरजू रुग्णांची मदत केली.