जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी हिऱ्यांच्या खाणी आहेत. या खाणींमधून शेकडो हिरे काढण्यात आलं आणि यांच्या माध्यमातून हिऱ्यांच्या अनेक कंपन्या श्रीमंतीच्या शिखरावर पोहोचल्या. अशात तुम्हाला हे वाचून आनंद होईल की, जगात एक अशीही हिऱ्याची खाण आहे, जिथे कुणीही सर्वसामान्य लोक जाऊन हिरे शोधू शकतात. इतकंच नाही तर इथे ज्या व्यक्तीला हिरा मिळेल, तो हिरा त्या व्यक्तीचाच होतो.
ही खाण अमेरिकेच्या अरकान्सास राज्याच्या पाइक काउंटी क्षेऊातील मरफ्रेसबोरोमध्ये आहे. येथील अरकान्सास नॅशनल पार्कमध्ये ३७.५ एकराच्या शेतातील जमिनीवरच हिरे सापडतात. इथे १९०६ पासून डायमंड मिळणे सुरू झाले, त्यामुळे या ठिकाणाला 'द क्रेटर ऑफ डायमंड्स' असंही म्हटलं जातं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑगस्ट १९०६ मध्ये जॉन हडलेस्टोन नावाच्या एका व्यक्तीला त्याच्या शेतात दोन चमकते दगड मिळाले होते. त्यांनी हे दगड एक्सपर्टला दाखवले तर कळाले की, हे हिरे आहेत. त्यानंतर जॉनने त्याची २४३ एकर जमीन एका डायमंड कंपनीला चांगल्या किंमतीत विकली.
१९७२ मध्ये डायमंड कंपनीने खरेदी केलेली जमीन नॅशनल पार्कमध्ये गेली. त्यानंतर अरकान्सास डिपार्टमेंट ऑफ पार्क अॅन्ड टूरिज्मने जमीन डायमंड कंपनीकडून खरेदी केली आणि हे ठिकाण सर्वसामान्य लोकांसाठी खुलं केलं. मात्र, या खाणीत सर्वसामान्य लोकांना हिरे शोधण्यासाठी नाममात्र फी द्यावी लागते.
या शेतातून लोकांना आतापर्यंत हजारो डायमंड मिळाले आहेत. नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांनुसार, १९७२ पासून आतापर्यंत या जमिनीवर ३० हजारांपेक्षा अधिक हिरे मिळाले आहेत. 'अंकल सेम' नावाचा हिरा याच जमिनीत मिळाला होता. हा हिरा ४० कॅरेटचा होता. हा अमेरिकेत मिळालेला सर्वात मोठा हिरा आहे.
इथे सापडणारे हिरे सामान्यपणे छोट्या आकाराचे असतात. चार ते पाच कॅरेटचे हिरे इथे अधिक सापडतात. इथे लोक मोठ्या संख्येने हिरे शोधण्यासाठी येतात. यात आता ज्याचं नशीब चांगलं त्याला हिरे सापडतात तर काहींना हाती काहीच लागत नाही.