Bride Groom News: लग्नाच्या दिवशीच अनेक दुर्घटना घडल्याच्या दुर्दैवी घटना नेहमीच समोर येत असतात. अशात दोन्ही परिवार टेंशनमध्ये असतात. अशीच एक घटना समोर आली. एका नवरदेवाचं शरीर लग्नाआधी 32 टक्के भाजलं. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यामुळे लग्न रखडलं. मात्र, त्याच्या पार्टनरने हॉस्पिटलमध्ये येऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांचं लग्न जॉर्जिया हॉस्पिटलच्या बर्न यूनिटमध्ये पार पडलं.
न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, नवरदेव प्रेस्टन कॉब जो इराक युद्धातील एक सन्मानित सैनिक होता, त्याने गेल्या सप्टेंबरमध्ये साखरपुडा केल्यानंतर या 22 जुलैला लग्नाचा निर्णय घेतला होता. पण लग्नाआधी 30 जूनला प्रेस्टन एका रासायनिक गळतीचा शिकार झाला. ज्यामुळे तो 32 टक्के भाजला.
कॉब म्हणाला की, "मी पाहिलं की, माझ्या हाताची त्वचा वेगळी झाली आहे आणि इतर ठिकाणीही भाजलं आहे. मला असं वाटलं होतं की, माझा अंत जवळ आला आहे'.
कथितपणे नवरदेवाची स्थिती इतकी गंभीर होती की, त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. जेव्हा कॉब केमिकलमध्ये पडला तेव्हा तापमान 1,500 डिग्री फॅरेनहाइट होतं. ज्यामुळे त्याला त्याच्या पायाची 9 बोटं गमवावी लागली. डॉक्टरांना त्याच्या डाव्या हाताची चार बोटेही कापावी लागली. प्रेस्टनला भीती होती की, त्याची पार्टनर आता त्याच्यासोबत लग्न करणार नाही.
पण त्याला चुकीचं ठरवत तनेशाने त्याची साथ दिली. जसा कॉब ठीक झाला त्यांची लग्नाची तारीख जवळ आली होती. परिवारातील लोक, मित्र यांच्या उपस्थितीत दोघांनी हॉस्पिटलमध्येच लग्न केलं.