लोक आजारी पडल्यानंतर उपचार घेण्यासाठी डॉक्टरांकडे जातात आणि उपचार घेतात. मात्र, चीनमधील लोक संधिवातावरील उपचारासाठी एक विचित्र गोष्ट करताना दिसत आहेत. येथे लोक 'रूमेटिक आर्थरायटिस' बरा करण्यासाठी वाघाच्या मूत्राचा वापर करत आहेत. परिस्थिती तर अशी आहे की, चिनी बाजारपेठांमध्ये वाघांचे मूत्र बाटल्यांमध्ये भरून विकले जात आहे. विशेष म्हणजे, याला किंमतही चांगली मिळत आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, या प्राणीसंग्रहालयाकडून वाघाचे मूत्र 50 युआन (जवळपास 600 रुपये) प्रति बॉटल (२५० ग्रॅम) दराने विकले जात आहे.
प्राणीसंग्रहालयानंही केलीय वाघांचं मूत्र विकायला सुरुवात -नैऋत्य चीनच्या सिचुआन प्रांतातील एक प्राणीसंग्रहालय संधिवातावरील उपचार म्हणून वाघाचे मूत्र विकत आहे. या प्राणीसंग्रहालयाचे नाव आहे 'याआन बिफेंगक्सिया वन्यजीव प्राणीसंग्रहालय'. हे प्राणीसंग्रहालय येथे येणाऱ्या पर्यटकांना सायबेरियन वाघांचे मूत्र विकत आहे. तसेच, यामुळे संधिवात, मुरगळणे आणि स्नायूंच्या दुखण्यापासून चमत्कारिक आराम मिळतो, असा दावाही करत आहे.आलं घालून शरीराला लावा अथवा प्या... -प्राणीसंग्रहालयाने संधिवातापासून आराम मिळविण्यासाठी वाघाच्या मूत्राचा वापर कसा करावा, यासंदर्भातही सूचना दिल्या आहेत. यासाठी वाघाच्या मूत्रात व्हाइट वाइन अथवा आल्याचे तुकडे मिसळा आणि वेदना होत असलेल्या ठिकाणी लावा, असे सांगण्यात आले आहे. एवढेच नाही, तर वाघाचे मूत्र पिऊही शकता. मात्र, कुणाला काही अॅलर्जी असेल, तर याचे सेवन करू नये, असेही संबंधित प्राणीसंग्रहालयाने म्हटले आहे.
चीनमध्ये उडाली खळबळ -वाघाच्या मूत्रासंदर्भातील या बातमीने संपूर्ण चीनमध्ये खळबळ उडवून दिली आहे. अनेक डॉक्टर याचा तीव्र विरोध करत आहेत. तसेच, अशा अप्रमाणित उपचारांना प्रोत्साहन दिल्याने अनेक धोके निर्माण झाले आहेत, असेही डॉक्टरांनी म्हटले आहे.