एखाद्या नात्यात कुणाचीही फसवणूक करणे हे वाईटच. पण, हे नातं जोडीदारासोबतच असेल आणि त्यात फसवणूक होत असेल, तर ती मात्र मोठी चूकच आहे. प्रेम आणि विश्वास यांच्यावर आधारित नात्यात एका व्यक्तीने तब्बल १० वर्षे आपल्या जोडीदाराला धोका दिला. हा व्यक्ती एकाच वेळी सहा मुलींसोबत संबंध ठेवत होता. ही फसवणूक करण्यासाठी त्याने एक विशेष 'सिस्टीम' तयार केली होती, पण एका कुत्र्यामुळे त्याचे सगळे कारनामे उघडकीस आले. ही धक्कादायक घटना ब्रिटनमध्ये घडली आहे.
धोकेबाजीचा 'मास्टरमाइंड' डॅनी!
डॅनी नावाच्या या व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडला १० वर्षे अंधारात ठेवले. 'द सन' या वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, डॅनीने या फसवणुकीसाठी एक पूर्ण प्लॅन तयार केला होता. डॅनी प्रत्येक गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी एक रंगीत कॅलेंडर वापरायचा. प्रत्येक रंगाचा अर्थ कोणत्या दिवशी कोणत्या मुलीला भेटायचे हे ठरलेले असायचे. यासोबतच तो तीन फोन वापरायचा. एक फोन सामान्य वापरासाठी, तर इतर दोन फोन चिप्सच्या पाकिटात आणि घरातल्या एका नकली रोपात लपवून ठेवले होते.
एवढंच नाही, तर त्याने आपल्या गर्लफ्रेंडचं लक्ष फोनवरून हटवण्यासाठी एका पोपटास खास प्रशिक्षण दिले होते. जेव्हा फोनवर नोटिफिकेशन येत असे, तेव्हा तो पोपट विचित्र आवाज काढत असे, ज्यामुळे गर्लफ्रेंडचं लक्ष पोपटाकडे वेधलं जाई. गर्लफ्रेंडला संशय येऊ नये म्हणून तो अनेकदा घरातल्या बॉयलरचा दाबही कमी करायचा, जेणेकरून तो लवकर निघून जाण्यासाठी योग्य कारण देऊ शकेल.
कुत्र्यामुळे सत्य आले समोर
डॅनीची एक गर्लफ्रेंड तिच्या कॉकपू जातीच्या कुत्र्यासोबत त्याच्या घरी आली होती. परत जाताना तिच्या कुत्र्याचे काही केस डॅनीच्या शर्टवर चिकटले. जेव्हा तो आपल्या पहिल्या गर्लफ्रेंडकडे परतला, तेव्हा तिला शर्टवर कुत्र्याचे केस दिसले. तिला कुत्रे अजिबात आवडत नसल्याने तिला संशय आला आणि तिने डॅनीवर प्रश्नांची सरबत्ती केली. अखेर, डॅनीला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली आणि त्याचे १० वर्षांचे खोटे उघडकीस आले.