वाडा - तालुक्यातील गारगाव या गावी सरगम मुकणे या चौथीत शिकणाऱ्या मुलाने एक कावळा पाळला असून, तो कावळा काका, बाबा, आई, ताई असे शब्द स्पष्ट बोलत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा बोलणारा कावळा पाहण्यासाठी तालुका आणि परिसरातील नागरिक गर्दी करू लागले आहेत.
तालुक्यातील गारगाव हे अतिदुर्गम व जंगल परिसरातील गाव आहे. येथील सरगम मंगळू मुकणे या चौथीत शिकणाऱ्या मुलाने एक कावळा पाळला आहे. हा कावळा सरगम हा मुलगा करेल तसे हावभाव करतो. तसेच काका, आई, बाबा, ताई असे शब्द स्पष्ट बोलतो. जंगलाला लागून एका फार्म हाऊसमध्ये सरगम याचे कुटुंब राहात असून, त्यांच्याच सोबत हा कावळा राहात आहे. पंधरा दिवसांची कावळ्याची दोन पिल्ले सरगमला एका झाडाखाली दोन वर्षांपूर्वी सापडली होती.
त्यानंतर त्याने ती त्याच्या घरी आणून पाळली. मात्र, यातील एक कावळा मृत्युमुखी पडला व एक जिवंत असून, तो आता दोन वर्षांचा झाला आहे. बाहेरचे कावळे येथे येतात, मात्र त्यांच्यात तो मिसळत नाही, असे सरगमने सांगितले.
‘रेवन’सारख्या कावळ्यांच्या काही प्रजाती माणसांच्या बोलण्याची नक्कल करू शकतात. बंदिवासात ठेवून शिकवलेले कावळे अशा प्रकारची नक्कल करतात. परंतु, हा पालघर येथील वाडा तालुक्यातील साधारण घर कावळा म्हणजेच ‘हाऊस क्रो’ अशाप्रकारे मानवी आवाजाची नक्कल करत आहे, ते पहाण्याकरीता विशेष वाटत आहे. - शंतनू कुवेसकर, वन्यजीव अभ्यासक, माणगाव