बोदवड : येथील कबरस्थानच्या कामासाठी शहरातील नईमखान बागवान या तरुणाने गुरुवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
कबरस्थानच्या कामासाठी सुशोभीकरण तसेच शोकसभा मंडप, सभा मंडप असा एकूण कामासाठी सन २०१८ मध्ये ४० लाखांचा निधी माजी आमदारांनी मंजूर केला होता. पण या कामासाठी प्रस्ताव तयार नसल्याने हा निधी परत गेला होता. हा निधी आमदार चंद्रकांत पाटील परत आणला व त्याची प्रस्ताव प्रक्रिया होऊन निविदा पूर्ण झाली. हा ठेका जळगावच्या ठेकेदाराला मिळाला. पण या कामात नगरपंचायतीने बहुमताने हा ठेका रद्द केला आहे. कामाचा ठेका दिलेल्या ठेकेदाराला द्यावा, हे काम सुरू करावे यासाठी या तरुणाने उपोषण सुरू केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी भेट देत पाठिंबा दर्शवला आहे, तर नईमखान हा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे कबरस्थानच्या कामात राजकारण शिरल्याचे म्हटले जात आहे.