सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुर चौधरी हा तरुण पुण्यात खासगी नोकरीला आहे. लॉकडाऊनमुळे सध्या जळगावातील घरुनच ऑनलाइन कामकाज सुरू आहे. अमरावती शहरात त्याचे स्वत:चे घर असल्याने मॅजिकब्रिक्स या वेबसाईटवर ऑनलाइन जाहिरात दिली होती. त्यावरून ५ जून रोजी रणदीप सिंग नाव सांगून एका व्यक्तीने मोबाइलवर संपर्क साधला व मी आर्मीत जम्मू काश्मिरला नोकरीला असून, अमरावती युनिटला बदली झालेली आहे. त्यामुळे मला तुमचे घर भाड्याने घ्यायचे आहे, असे सांगितले. त्यानुसार चौधरी याने आधार कार्ड, पॅन कार्ड व कँटीन कार्ड व्हाॅटस् ॲपवर पाठवा म्हणून सांगितले असता, समोरील व्यक्तीने ते पाठविलेही. त्यानंतर संबंधित व्यक्तीने चौधरीकडे पेटीएम क्रमांक मागितला असता, त्यानेही तो दिला.
काही क्षणातच बँक खात्यातून पैसे वळविले
मयुर चौधरी याला ११ जून रोजी रात्री ८ वाजता संबंधित व्यक्तीचा फोन आला व १ रुपयाचा क्युआर कोड पाठवितो व तो तुम्ही पेटीएमवर स्कॅन करा त्यानंतर माझा एक रुपया व तुमचा एक रुपया परत येईल, असे असे तो म्हणाला. त्यानुसार दोन रुपये मयुरच्या खात्यावर आले. त्यानंतर संबंधिताने मयुरला परत क्युआर कोड पाठविला. त्यावरून १५ हजार ९९९ रुपये असे तीन वेळा ४७ हजार ९९७ रुपये मयुरच्या पेटीएमवरून पाठविले गेले. त्यानंतर मयुर याने घरी जाऊन परत १८ हजार रुपये पाठविले. एकूण ९५ हजार ९९६ रुपये मयुरच्याच पेटीएमवररून संबंधित व्यक्तीला पाठविण्यात आल्याचे उघड झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने सायबर क्राइम या पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदविली. गुरुवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला.