चाळीसगाव : तालुक्यातील करगाव तांडा क्रमांक तीन येथील २२ वर्षीय तरुणाने जुन्या वादाच्या कारणावरून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत ग्रामीण पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील करगाव तांडा क्र. ३ येथील प्रवीण नारायण जाधव (२२) याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी रात्री ८.१५ वाजता उघडकीस आली होती. मयताचा भाऊ अरविंद नारायण जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रवीण व उमेश पांडुरंग राठोड, राकेश राठोड, राजेश पांडुरंग व छापाबाई पांडुरंग राठोड यांच्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. तेव्हापासून या चारही जणांकडून प्रवीण यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली जात होती. त्यामुळे जुन्या वादाच्या कारणावरून त्याने आत्महत्या केल्याचे आरोप घरच्यांनी केले आहेत. भाऊ अरविंद नारायण जाधव यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०६, ३४ प्रमाणे वरील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संपत अहिरे करीत आहेत.