जळगाव : तालुक्यातील कठोरा येथे समाधान वसंत बाविस्कर (२५) या तरुणाने गावाच्या बाहेर चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. समाधान हा अविवाहित होता. त्याने आत्महत्या का केली, याचे कारण समजून आले नाही.
समाधान याच्या वडिलांचे १५ वर्षापूर्वीच निधन झालेले आहे. त्यामुळे तो आई हिरकणबाई असे दोघे जण मामाच्या गावाला वास्तव्याला आले होते. बुधवारी सायंकाळी आईसोबत त्याने जेवण केले. रात्री आई झोपून गेली. सकाळी उठल्यावर समाधान याने गावाच्या बाहेर गळफास घेतल्याचे समजले. त्याने रात्रीच गळफास घेतला की सकाळी, हे देखील स्पष्ट झालेले नाही. मामा पितांबर रामचंद्र अहिरे (रा. कठोरा) यांनी इतरांच्या मदतीने समाधान याला जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.