लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केंद्र शासनाच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन अभियान अंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कामांना गती देण्याबरोबर अद्याप जी कामे सुरू व्हावयाची आहेत ती कामे सर्व संबंधित यंत्रणानी सुरू करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शुक्रवारी दिले.
राष्ट्रीय रुरबन मिशन नियामक समितीची बैठक जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सी.एम. सिन्हा, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिगंबर लोखंडे उपस्थित होते.
या अभियानात हरताळा गाव समूह ता. मुक्ताईनगर, पातोंडा, ता. चाळीसगाव, एनगाव, ता. बोदवड यांची निवड करण्यात आली आहे. या अभियानात हरताळा परिसरातील सहा गावांमध्ये ३४२.९६ कोटींच्या ३१० कामांची नोंद करावयाची आहे. त्यापैकी २०१ कामांची नोंद तर १९३ कामांचे जिओ टॅगिंग करण्यात आले आहे. पातोंडा परिसरातील चार गावांमध्ये ९७ कोटी खर्चाच्या २१६ कामांची नोंद केली आहे. तर ९५ कामांचे जिओ टॅगिग करण्यात आले आहे. तसेच एनगाव गाव समूहातील चौदा गावांमध्ये ७१.५५ कोटींच्या १४५ कामांची नोंद करावयाची असून त्यापैकी फक्त ४६ कामांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती दिगंबर लोखंडे यांनी केली आहे.