पारोळा : येथील भूमी अभिलेख कार्यालयाचे वीजबिल थकीत असल्याने गेल्या महिनाभरापासून या कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. शासनाने गेल्या दोन महिन्यांपासून वीजबिलाचे अनुदान दिले नसल्याने गेल्या दोन महिन्यांचे वीजबिल थकीत आहे. २२ हजार रुपये वीजबिल थकीत असल्याने गेल्या महिनाभरापासून वीजपुरवठा खंडित झाला असून कामकाजही ठप्प आहे. यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला असल्याने सर्व कामकाज ठप्प झाले आहे. वीजबिल भरण्यासाठी शासनाच्या अनुदानाची वाट अधिकारी पाहत आहेत. मग अनुदान जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत बिल भरले जाणार नाही का, असा प्रश्न सामान्य नागरिकांनी उपस्थित केला असून या गोष्टीचा नाहक मनस्ताप आणखी किती दिवस सहन करावा लागणार आहे, याची चिंता संबंधित नागरिकांना आहे.
प्रभारी अधिकाऱ्याकडे कारभार
येथील भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार हा उसनवारी म्हणजे एरंडोल येथील व्ही.एल. पाटील या प्रभारी अधिकाऱ्यामार्फत चालू आहे. तर महिनाभरापासून खंडित वीजपुरवठ्याचे कारण पुढे करून या कार्यालयात कामकाज ठप्प आहे. ग्रामीण भागातील अनेक लोक नकाशा, नक्कल, बोजा चढविणे व कमी करणे, मोजणी शीट , ७/१२ उतारा आदी कामांसाठी फिरत आहेत. काही लोकांनी शेती, प्लॉट मोजणीसाठी तातडीची फी भरली आहे. पण वीजपुरवठा ठप्प झाल्यामुळे सर्व कामेही ठप्प आहेत.