सुलवाडे, ता.रावेर : शेतात वीज पडून महिला जागीच ठार झाल्याची घटना सुलवाडे येथे गुरुवारी सकाळी साडेअकराला घडली. आशाबाई राजेंद्र महानुभाव (वय ३५) असे मयत महिलेचे नाव आहे.सूत्रांनुसार, राजेंद्र केशव महानुभाव, त्यांची पत्नी आशाबाई व मुलगी असे तीन जण गुरुवारी सकाळी गावालगतच्या शेतात शेतीच्या कामासाठी गेलेले होते. या दरम्यान अकरा-साडेअकराला पाऊस सुरू झाला. यामुळे आशाबाई राजेंद्र महाजन या शेतातच असलेल्या निंबाच्या झाडाखाली थांबल्या आणि राजेंद्र व त्यांची मुलगी शेतातच थांबले. नेमकी याच वेळी वीज या झाडावर कोसळली. त्यात झाडाखाली थांबलेल्या आशाबार्इंचा जागीच मृत्यू झाला.घटना घडली तेव्हा आशाबार्इंच्या कानातील सोन्याचे डूल तसेच पायातील चांदीच्या तोरड्या आपोआप जमिनीवर गळून पडल्याचे दिसले.रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. आशाबार्इंच्या पश्चात पती, दोन मुले, सासू-सासरे व दीर असा परिवार आहे.घटनास्थळी तहसीलदार उषाराणी देवगुणे, निंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश जानकर, तलाठी विजय शिरसाठ यांनी भेट दिली.
रावेर तालुक्यातील सुलवाडे येथे शेतात वीज पडून महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 16:32 IST