अतिप्रमाणात औषधी सेवन केल्याने प्रौढाचा मृत्यू
जळगाव : एमआयडीसीतील पंढरपूर नगरात राहणाऱ्या प्रभाकर घनशाम पवार (वय ४२) यांनी अतिप्रमाणात औषधी सेवन केल्याने त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी १२.४० वाजता ही घटना उघडकीस आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी डॉ. रेणुका भंगाळे यांनी दिलेल्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास चेतन सोनवणे करीत आहेत.
व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना वाढीव पोलिस कोठडी
जळगाव : तूर व चणाडाळ खरेदी करून सहा व्यापाऱ्यांकडून ४५ लाख ६६ हजार ८८८ रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या कौशिक रामभाई पटेल व अरविंद वेलजीभाई क्याडा या दोघांना न्यायालयाने सोमवारी एक दिवसाची वाढीव पोलीस कोठडी सुनावली. एमआयडीसी पोलिसांनी ८ जुलै रोजी त्यांना अटक केली आहे. कोठडीची मुदत संपल्यामुळे तपासाधिकारी अतुल वंजारी यांनी सोमवारी दोघांना न्यायालयात हजर केले.