लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मनपाला नगरोथ्थान व दलित वस्तीसुधार योजनेतंर्गत मिळालेल्या निधीला याआधीच ऑगस्टमध्ये मंजुर झाल्याचे उघडकीस आल्यामुळे बुधवारी होणाऱ्या महासभेत जुन्या निधीवरच सुचविलेल्या कामांना आता महासभा मंजुरी देते का ? याकडे लक्ष लागले आहे. मनपाला नवीन १० कोटींचा निधी मिळाल्याने पदाधिकाऱ्यांनी कामांचे नियोजन करून, विशेष महासभेत मंजुरी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निधी महापालिकेने ऑगस्ट २०२० मध्येच घेतल्याचे आणि त्यातही विशिष्ट नगरसेवकांच्याच प्रभागात ती कामे होणार असल्याचे समोर आले होते. त्यामुळे या विषयावर महासभेत चर्चा होते का ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मनपाच्या विशेष महासभेचे आयोजन बुधवारी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. या महासभेत एकूण ६ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. मात्र, आयत्या वेळच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मनपात सत्ताधारी भाजपने वर्षभरापुर्वी स्थापन केलेल्या विविध विशेष समित्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे या अकरा समित्या बरखास्त करण्यात येणार असून, याबाबतचा प्रस्ताव महासभेत ठेवण्यात येणार आहे. तसेच पुढील वर्षभरासाठी नव्याने समित्यांचे गठण करण्यात येणार आहे. विशेष समित्यांचे गठन करताना पक्षीय संख्याबळानुसार सदस्यांची नियुक्ती करण्यात येतात. दरम्यान, गेल्यावेळेस समित्यांवर जाण्यास नकार देणाऱ्या शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या विषयासह अपार्टमेंटमधील नळ कनेक्शनचा विषयावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.