चाळीसगाव : चाळीसगाव येथे चढ्या भावाने रासायनिक खतांची विक्री होत आहे. युरिया नसल्याचे सांगत मिश्र खते घेण्याची सक्ती केली जात आहे. विशेष म्हणजे २६६ रुपयाला मिळणारा युरिया ३०० रुपयांना मिळत आहे. याबाबत कृषी विभागाकडे तक्रार केली तर जादा दराने युरिया विकणाऱ्या या दुकानदाराने कृषी अधिकाऱ्यांसमोरच होय आम्ही ३०० रुपयाला युरिया विकतो, आम्हाला २६६ रुपयात युरिया विकणे परवडत नाही असे सांगत कृषी विभागाची बोलतीच बंद केली.
चाळीसगाव तालुक्यात शंभर टक्के पेरणी झाली असून गेल्या दोन दिवसांपासून पाऊस चांगला झाल्याने पिकांची वाढ होण्यासाठी युरिया खताची गरज आहे. तालुक्यातील शेतकरी खत विक्रेत्यांकडे खते घेण्यास जात आहेत. मात्र दुकानदार खते देण्यास त्यांची अडवणूक करून युरिया खत पाहिजे असल्यास मिश्र खते घेण्यास बंधनकारक करीत असल्याचे शेतकऱ्यांनी रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार,प्रदेश अध्यक्ष संतोष निकुंभ यांना सांगितले.
रयत सेनेच्यावतीने चाळीसगाव तालुका कृषी अधिकारी साठे व पंचायत समिती कृषी अधिकारी भालेराव यांना निवेदन देऊन खत विक्रेत्यांचा स्टॉक तपासणी करण्याची मागणी लावून धरली. तालुका कृषी अधिकारी साठे व पंचायत समिती कृषी अधिकारी भालेराव
यांच्यासह गणेश पवार, संता पैलवान यांनी घाट रोड वरील कृषी केंद्र येथे जाऊन खत उपलब्ध आहेत का अशी विचारणा केली असता कृषी केंद्र चालकाने खत उपलब्ध असल्याचे सांगितले.
कृषी अधिकारी साठे व भालेराव यांनी त्यांना सांगितले की प्रति बॅग युरिया २६६ रुपये दराने शेतकऱ्यांना खत देणे बंधनकारक असताना तुम्ही प्रति बॅग ३०० रुपये दराने विक्री करत असल्याचे सांगताच त्यांनी देखील कबूल केले की, आम्ही युरिया प्रती बॅग ३०० रुपयांनी विक्री करत आहोत. डिझेलचे दर वाढले आहेत, जळगावहून खत आणावे लागते त्यासाठी खर्च मोठा होतो त्यामुळे २६६ रुपयात
युरिया विकणे परवडत नाही. कृषी अधिकाऱ्यांसमोरच खत दुकानदाराने वाढीव दराने रासायनिक खत विक्री करीत असल्याची एक प्रकारे कबुली दिली आहे.
अमळनेर
अमळनेर : तालुक्यात ६८हजार हेक्टर खरीप लागवडीचे क्षेत्र आहे. त्यापैकी ६३ हजार १७७ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ९० टक्के लागवड झाली आहे. सर्व प्रकारची खते उपलब्ध आहेत.
शेतकऱ्यांना युरिया , १०-२६-२६,सुफला १५-१५-१५, डी एफ ई, १६-१६-१६, १९-१९-१९ आदी प्रकारची खते उपलब्ध आहेत. काही
दुकानदार इतर मिश्र खते घेण्याची सक्ती करत होते मात्र कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर तो प्रकार बंद झाला.
कोट
चढ्या दराने रासायनिक खते मिळत असल्याची तक्रार आल्यानंतर संबंधित दुकानात जाऊन खात्री केली. त्यात तथ्य आढळल्याने संबंधित दुकानदाराला नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यावर कारवाई केली जाईल. तसेच इतर रासायनिक दुकानदारांची तपासणी केली जाणार आहे. खत दुकानदारांनी शेतकऱ्यांना रास्त भावात खते विक्री करावी, लुबाडणूक करू नये अन्यथा कारवाई
केली जाईल.
-एम.एस. भालेराव, कृषी अधिकारी, पं.स. चाळीसगाव.
कोट
बफर स्टॉकमधून ३६ कृषी सेवा केंद्रांना प्रत्येकी आठ मेट्रिक टॅन युरिया उपलब्ध होत आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना दुसऱ्या डोससाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
- भारत वारे, तालुका कृषी अधिकारी, अमळनेर
पारोळा तालुक्यातील
युरियाची कृत्रिम टंचाई
पारोळा : पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांना युरियाची कृत्रिम टंचाई करून शेतकऱ्यांनी युरिया बॅग मागितली असता त्यासोबत इतर खते देण्याची सक्ती केली जात आहे.
येत्या आठ दिवसात युरिया खताची कृत्रिम टंचाई दूर होऊन शेतकऱ्यांना युरिया खताबाबत दिलासा द्यावा, अन्यथा शेतकरी संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत शेतकऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, प्रवक्ते प्रा. भिकनराव पाटील शहर युवा अध्यक्ष नीलेश चौधरी, ॲड. भूषण माने उपस्थित होते.