जळगाव : यंदाच्या नवीन वर्षाला सुरुवात झाल्यापासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात १९०.५० रुपयांनी वाढ झाली असून दर महिन्यालाच होणाऱ्या गॅस दरवाढीमुळे सर्वांचीच चिंता वाढत आहे. सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या गॅस सिलिंडरचे दर आता श्रीमंतांनाही विचार करायला लावणारे असून आता फ्लॅटमध्येही चुली पेटवायच्या का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गॅसचे दर वाढत असले तरी सिलिंडरवर मिळणारी सबसिडी मिळतच नसल्याने दिवसेंदिवस गॅसदरवाढीचा बोझा वाढतच आहे.
घरगुती वापरासह आता प्रत्येक खाद्य पदार्थांच्या दुकानावर गॅसचा वापर वाढला आहे. त्यामुळे हा घटक प्रत्येक ठिकाणी आवश्यकच बनला आहे. मात्र गॅस सिलिंडरचे वाढते दर सर्वांना चिंतेत टाकत असून या वाढत्या दराने आर्थिक नियोजन कोलमडत आहे. सर्वच ठिकाणी भाववाढ होत असल्याने करायचे काय, असा प्रश्न गृहिणी, व्यावसायिकांनाही पडत आहे. गॅस दर वाढले म्हणून चुलीचा पर्याय निवडला तर घरात फारशी जागा नसल्याने चूलदेखील पेटवता येत नाही, अशी अडचण शहरी भागात जावणते. मात्र वाढत्या दरामुळे आता खरोखर चूल पेटवावी का, अशीच स्थिती निर्माण झाली आहे.
दर महिन्याला नवा उच्चांक
दिनांक-दरवाढ-सिलिंडरचे दर
डिसेंबर २०२० --०.५०- ६९९.००
जानेवारी २०२१ -०.५० ६९९.५०
फेब्रुवारी २०२१ -२५.०० ७२४.५०
मार्च २०२१ -८०.०० ८०४.५०
एप्रिल २०२१ - १०.००-८१४.५०
मे २०२१ -००.०० ८१४.५०
जून २०२१ -००.०० ८१४.५०
जुलै २०२१ -२५.५०- ८४०.००
ऑगस्ट २०२१-२५.००-८६५
सप्टेंबर २०२१-२५.००-८९०
सबसिडी किती भेटते हो भाऊ
गॅस सिलिंडरचे दर वाढले तरी सबसिडी मिळत नसल्याने या विषयी किती सबसिडी मिळणार, अशी विचारणा केली जात आहे. गॅसचे भाव २०१९ च्या सुमारासदेखील जास्त होते. मात्र नंतर बँक खात्यात सबसिडी जमा होत होती. त्यामुळे नागरिकांना फारसा आर्थिक बोजा पडत नव्हता. कोरोनाच्या काळात पहिल्या लॉकडाऊनमध्ये शासनाने गॅस सिलिंडरचे दर एकदम कमी केले. मात्र त्यासोबतच सबसिडी देणे बंद केले होते. नंतर भाववाढ झाली तरी सबसिडी काही मिळायला सुरुवात झालेली नाही.